मटण विक्री बंदी मागे घ्या, अन्यथा केडीएमसीत कोंबड्या सोडू; काँग्रेसचा आयुक्तांना इशारा

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने १५ ऑगस्ट रोजी पालिका क्षेत्रात मटणाची दुकाने बंद ठेवण्याचा फतवा काढला आहे. महाराष्ट्र राज्य चिकन मटण विक्रेता असोसिएशनने हा आदेश मागे घ्या, अन्यथा १५ ऑगस्टला केडीएमसीच्या गेटवरच दुकाने थाटून कोंबड्या-बकऱ्या कापण्याचा इशारा दिला आहे. आता काँग्रेसनेही १५ ऑगस्ट रोजी केडीएमसी मुख्यालयात कोंबड्या सोडण्याचा इशारा आयुक्तांना दिला आहे.

स्वातंत्र्यदिनानिमित्त कल्याण-डोंबिवली महानगरपालि का क्षेत्रात चिकन-मटण दुकाने, कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय कल्याण-डोंबिवली महापालिकेने घेतला आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारादेखील केडीएमसीने दिला आहे. या निर्णयाला महाराष्ट्र राज्य चिकन-मटण व्यापारी असोसिएशनने विरोध केला आहे. असोसिएशनच्या मागणीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, मनसे यांनी पाठिंबा दिला आहे. आता काँग्रेसनेही पालिका आदेशाला विरोध केला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी महापालिकेचे उपायुक्त योगेश गोडसे यांची भेट घेऊन बंदीचा निर्णय तत्काळ मागे घेण्याची मागणी केली.

ही तर हुकूमशाही

शहरात वाहतूककोंडी, खड्डे, पाणीटंचाई, गटार सफाई, दूषित पाणीपुरवठा, हॉस्पिटलची स्थिती, कचरा व्यवस्थापन यांसारख्या गंभीर समस्या असताना महापालिका मात्र मांस विक्री बंदीसारखे निर्णय घेऊन नागरिकांवर हुकूमशाही लादत आहे. महापालिकेने नागरिकांच्या खाण्यावर बंधने घालणे म्हणजे स्वातंत्र्यावर गदा आणणे आहे. जर ही बंदी मागे घेतली नाही तर पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या पालिका मुख्यालयात सोडण्याचा इशाराही पोटे यांनी दिला.