
घनकचरा व्यवस्थापनाचा ठेका मिळालेल्या नवीन ठेकेदाराने अचानक 750 कंत्राटी कामगारांना कमी केल्याने आज सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन केले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवत ठेकेदाराला धारेवर धरले. अखेर सुमित एन्कलोप्लास्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने नमते घेत सर्व कामगाराना 15 ऑगस्टपासून टप्प्याटप्याने कामावर घेण्याचे आश्वासन दिले. शिवसेनेमुळे आमच्या नोकऱ्या वाचल्याचे समाधान कंत्राटी कामगारांनी व्यक्त केले.
केडीएमसी क्षेत्रात यापूर्वी सेक्युअर वन कंपनीकडून स्वच्छता आणि कचरा संकलनाचे काम केले जात होते. मात्र सध्या हे काम सुमित एन्कलोप्लास्ट प्रायव्हेट लिमिटेड या नव्या कंत्राटदाराकडे सोपविण्यात आले आहे. एकूण1250 कामगार सफाईचे काम करत होते. मात्र नव्या ठेकेदार कंपनीने 500 कामगारांनाच कामावर घेतले. उर्वरित 750 कामगारांबाबत चालढकल सुरू होती. त्यामुळे संतप्त कामगारांनी आज खंबाळपाडा वाहन डेपोबाहेर सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केले होते.
कामगारांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांची भेट घेऊन होणाऱ्या अन्यायाची माहिती दिली. त्यानंतर दीपेश म्हात्रे यांनी तत्काळ शिवसैनिकांसह खंबाळपाडा डेपोत धडक दिली. केडीएमसी उपायुक्त प्रसाद बोरकर आणि सुमित एन्कलोप्लास्टचे कंपनी व्यवस्थापनाचे प्रमुख अनंत जोशी, अभिषेक बुराशे यांना धारेवर धरले. अखेर ठेकेदार कंपनीने उर्वरित 750 कर्मचाऱ्यांना 15 ऑगस्टपासून कामावर घेण्याचे आश्वासन दिले. यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले.
जिल्हा संघटक तात्या माने, शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे, ओमनाथ नाटेकर, विजय भोईर, भगवान पाटील, सदाशिव गायकर, शाम चौगले, संजय पाटील, अर्जुन माने, राहुल चौधरी, चेतन म्हात्रे, सुप्रिया चव्हाण, प्रियांका विचारे, रिचा कामतेकर, प्रकाश कदम, जगदीश काजळे, प्रवीण वीरकुटे, अजय पोळकर, परेश म्हात्रे, स्वप्नील विटकर, शिभु शेख आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
धकीत पगारही मिळणार
ठेकेदार कंपनीने कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यासाठी पैशांची मागणी केल्यास कारवाई करण्याचा इशारा पालिका उपायुक्त बोरकर यांनी दिला. पूर्वीच्या कंत्राटदाराकडून थकलेला पगार लवकरात लवकर देण्याची कार्यवाही केली जाईल अशी हमीही त्यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिली. यापुढे कामगारांच्या हिताला बाधा निर्माण झाल्यास तीव्र आंदोल नाचा इशारा यावेळी दीपेश म्हात्रे यांनी दिला.