
सामना ऑनलाईन, मुंबई
सकाळी मुलुंड स्थानकात ओव्हरहेड वायरवर पडलेले झाड, ठाण्यापुढे सुरू असलेला मुसळधार पाऊस यामुळे लोकल वाहतुकीचा बोऱ्या वाजला आहे. अप आणि डाऊन या दोन्ही दिशेकडील लोकल ट्रेनची वाहतूक किमान 40 मिनिटे उशिराने सुरू आहे. लोकल गाड्या वेळेत येत नसल्याने अनेक स्थानकांवर भयंकर गर्दी झाली असून या गर्दीमुळे आणि मध्य रेल्वेकडून नीट माहिती मिळत नसल्याने सगळे प्रवासी वैतागले आहे.
Exclusive- ओव्हरहेड वायरवर झाड पडले, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मध्य रेल्वे माहिती देत नसल्याने फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून प्रवाशांनी इतरांना माहिती द्यायला सुरुवात केली आहे. फेसबुकवरील एका ग्रुपमध्ये महिला प्रवाशाने माहिती दिली की सकाळी 8.45 ला डोंबिवली स्थानकात येणारी अर्धजलद लोकल 55 मिनिटे झाली तरी आली नव्हती. दुसऱ्या एका प्रवाशाने माहिती दिली की ठाणे स्थानकात 25 मिनिटे सीएसएमटीकडे जाणारी एकही लोकल आली नव्हती. विक्रोळीला उभ्या असलेल्या प्रवाशानेही मुंबईकडे जाण्यासाठी अर्धा तासात एकही गाडी न आल्याचे कळवले.

सकाळी मुलुंड स्थानकात ओव्हरहेड वायरवर झाड पडल्याची सामना ऑनलाईनने बातमी दिली होती. या घटनेमुळे वाहतूक विस्कळीत झाल्याचे या बातमीत म्हटले होते. या बातमीनंतर काही मिनिटांतच रेल्वे प्रशासनातर्फे ट्विट करून वाहतूक अजिबात विस्कळीत झाली नसून गाड्यांची वाहतूक सुरू असल्याचं सांगितलं होतं.
It was on Dn slow line at Mulund for a brief period. Trains are not disrupted and are running on Central Railway
— Central Railway (@Central_Railway) July 6, 2019
मात्र सद्य परिस्थिती पाहता मध्य रेल्वेचा गोंधळ अजूनही सुरू असून लोकल ट्रेनची वाहतूक अजूनही विस्कळीतच असल्याचं पाहायला मिळतंय. मध्य रेल्वेने केलेला दावा आणि खरी परिस्थिती यात जमीन आस्मानाचा फरक असून यावरून मध्य रेल्वेने खोटे बोल पण रेटून बोल हे आपले धोरण अजिबात सोडले नसल्याचे दिसून आले आहे.

























































