Kalyan news – गांधारी पुलावर अग्निकल्लोळ; 25 हजार घरांत ब्लॅकआऊट

सबस्टेशनमधून गांधारी पुलालगत जाणाऱ्या वीज केबलना बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आग लागली. या अग्निकल्लोळामुळे पुलावरून जाणाऱ्या प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. या दुर्घटनेमुळे पारनाका, रौनक सिटी, स्पोर्टस् कॉम्प्लेक्स या तीन सबस्टेशनचा वीजपुरवठा खंडित झाला आणि कल्याण पश्चिमेतील तब्बल 25 हजार घरांत ब्लॅकऑऊट झाला. तब्बल पाच तासांनंतर सायंकाळी ५ वाजता वीजपुरवठा सुरळीत झाला आणि हजारो नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

  • दुपारच्या सुमारास या केबलना आग लागली आणि संपूर्ण वाहिन्या जळून खाक झाल्या. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले मात्र तोपर्यंत केबल पूर्णपणे जळून गेल्या होत्या.
  • घटनेची माहिती मिळताच महावितरणचे वरिष्ठ अधिकारी आणि अभियंते घटनास्थळी दाखल झाले. तातडीने पर्यायी वाहिन्यांवरून वीजपुरवठा सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात आले.
  • स्पोर्टस् कॉम्प्लेक्स व दुर्गाडी परिसरातील वीज काही तासांतच पूर्ववत करण्यात आली, मात्र रौनक सबस्टेशनवरील दोन फिडर सहा तास ठप्प राहिल्याने सुमारे पावसाळ्यातील उकाड्याने हैराण झालेल्या हजारो नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.

वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना फटका

वीजपुरवठा खंडित झाल्याने वर्क फ्रॉम होम करणाऱ्या नागरिकांचे काम ठप्प झाले, उद्योगधंदे आणि दैनंदिन व्यवहारांना फटका बसला. सोशल मीडियावरही महावितरणविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. याबाबत महावितरणने दोन्ही फिडरवरील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून शवन्य तितक्या लवकर वीजपुरवठा पूर्ववत केला जाईल असे सांगितले. संध्याकाळी पाचच्या सुमारास अखेर सर्व भागांचा बीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.