सामना प्रभाव – चमत्कार झाला, केडीएमसीचा ठेकेदार ताळ्यावर आला; सुमित कंपनीच्या कचरा गाड्यांवर नंबरप्लेट झळकल्या

कल्याण-डोंबिवली महापालिकेने कचरा संकलनासाठी सुमित एल्कोप्लास्ट या खासगी कंपनीला कंत्राट दिले आहे. या कंपनीकडून कचरा उचलण्यासाठी ५० हून अधिक गाड्या खरेदी केल्या आहेत. मात्र या गाड्या गेल्या दोन महिन्यांपासून विना आरटीओ नोंदणी आणि नंबर प्लेटशिवाय रस्त्यावर धावत होत्या. याबाबतचे वृत्त दैनिक ‘सामना’तून प्रसिद्ध होताच ठेकेदार ताळ्यावर आला. चमत्कार झाल्याप्रमाणे एका दिवसात सर्व गाड्यांना नंबरप्लेट बसली. आरटीओ नोंदणी आणि नंबरप्लेट असलेल्या गाड्याच घनकचरा व्यवस्थापन विभागात असतील, असे स्पष्टपणे पालिका प्रशासनाने ठेकेदाराला बजावले आहे.

पालिकेने शहरातील कचरा संकलनासाठी सुमित एल्कोप्लास्ट या खासगी कंपनीला करोडो रुपयांचे कंत्राट दिले आहे. या कंपनीकडून ५० हून अधिक गाड्यांद्वारे कचरा उचलला जातो. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून या गाड्या कोणतीही आरटीओ नोंदणी व नंबरप्लेटशिवाय रस्त्यावर धावत असल्याचे समोर आले. हा प्रकार शिवसैनिक कैलास सणस यांनी उघड केला होता. मुळात नंबर नसेल तर आरटीओ अवाजवी दंड आकारते. परंतु सुमित कंपनीच्या या कचऱ्याच्या गाड्या दोन महिन्यांपासून शहराच्या रस्त्यांवर बिनधास्त फिरत असूनही वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा अभाव होता. त्यामुळे या ठेकेदाराचा ‘आका’ कोण’, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात होता. दैनिक ‘सामना’ मध्ये याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच महापालिका आणि कल्याण व डोंबिवली वाहतूक शाखेने तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर ठेकेदार कंपनी व्यवस्थापनाने पळापळ करून तत्काळ गाड्यांवर नंबरप्लेट बसवल्या.

‘एचएसआरपी’ला ठेंगा

नवीन नियमानुसार सर्व गाड्यांना एचएसआरपी नंबरप्लेट बंधनकारक आहे. मात्र सुमित एल्कोप्लास्ट कंपनीकडून केवळ पिवळ्या नंबरप्लेटवर काळ्या अक्षरांनी नंबर टाकून तात्पुरती व्यवस्था केली आहे. त्यामुळे ठेकेदार वाहतूक पोलीस आणि आरटीओच्या डोळ्यात धूळफेक तर करत नाही ना, असा सवाल नागरिक विचारत आहेत.