कामाठीपुराच्या समूह पुनर्विकासासाठी पहिले पाऊल; प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनचे आज रहिवाशांसमोर सादरीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

म्हाडातर्फे राबविण्यात येत असलेल्या कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पाच्या नियोजित आराखड्याचे सादरीकरण उद्या, शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता अखिल पद्मशाली समाज, भावनाबाग, कामाठीपुरा, सहावी गल्ली येथे होणार आहे. कामाठीपुरा विकास समितीच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रस्तावित आराखड्याची माहिती स्थानिक रहिवासी, भाडेकरू, भूधारक तसेच संबंधित नागरिकांना उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या सहभागातून पुनर्विकासाची प्रक्रिया पुढे नेणे, हा यामागचा उद्देश आहे.

सुमारे ३४ एकर क्षेत्रामध्ये वसलेल्या कामाठीपुरा येथे ९४३ उपकरप्राप्त इमारती आणि ३४९ नॉन-सेस इमारतींचा समावेश आहे. या परिसरातील सुमारे ८ हजारांहून अधिक रहिवासी व भाडेकरू, त्यामध्ये सुमारे ६,६२५ निवासी आणि १,३७६ व्यावसायिक भाडेकरू, तसेच सुमारे ८०० जमीनमालक आहेत. अनेक दशकांचा वारसा लाभलेल्या या परिसरातील जुन्या व जीर्ण इमारतींचा नियोजित पद्धतीने पुनर्विकास करून रहिवाशांना सुरक्षित, आधुनिक आणि सुसज्ज निवासव्यवस्था उपलब्ध करून देणे हा या समूह पुनर्विकास प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. कामाठीपुराचा समूह पुनर्विकास म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत राबविण्यात येत असून यासाठी भागीरथी हाऊसिंग प्रा. लि. व माथी डेव्हलपर्स प्रा. लि. यांची बांधकाम आणि विकासक संस्था म्हणून नियुक्ती केली आहे. या प्रकल्पासाठी म्हाडाला नोडल एजन्सी तसेच विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्यात आला आहे.