
कांदाटी खोऱयात पर्यटन व सेंद्रिय शेतीस वाव आहे. या भागात दळणवळण व मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर लोकांचे स्थलांतर झाले आहे. कांदाटी खोऱयातील 16 गावे मागासलेली आहेत. या गावांच्या एकत्रित विकासासाठी इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट प्लॅन तयार करण्यात आला आहे. या विकास आराखडय़ाची मार्च महिन्यापासून अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रुचेश जयवंशी म्हणाले, कांदाटी खोऱयातील 16 गावांसाठी राबवण्यात येत असलेल्या विकास आराखडय़ात दळणवळण, स्वयंरोजगार, कौशल्य विकास, पर्यटन, सिंचनाच्या सोयी, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत सुविधांचा समावेश आहे. या खोऱयातील लोकांचा आर्थिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न आहे. गावात किमान 15 हजार रुपये प्रतिमहिना उत्पन्न मिळाल्यास स्थलांतरित लोक पुन्हा मूळ गावी येऊ शकतात. या समुचित विकास आराखडय़ाची अंमलबजावणी मार्च महिन्यापासून करण्यात येणार आहे.
दरे परिसरात सबस्टेशन करून ऍम्ब्युलन्स व इतर अत्यावश्यक सुविधा पुरवल्या जाणार आहेत. कोयना बॅक वॉटरमुळे अनेक बेटे निर्माण झाली असून, त्याठिकाणी पर्यटनाला संधी आहे. उन्हाळय़ात धरणाचे पाणी कमी झाल्यानंतर तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे ‘व्ही शेप’ भागात सिमेंट बंधारे बाधून पाणीपातळी राखली जाणार आहे. या आराखडय़ाच्या अंमलबजावणीसाठी पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, कृषी आदी विभाग काम करणार आहेत. हा आराखडा राज्यात रोल मॉडेल ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.