
बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबई महानगरपालिकेने बजावलेल्या नोटीशीविरुद्ध दिवाणी न्यायालयात दाखल केलेला खटला आज मागे घेतला. खारमधील ऑर्किड ब्रीझ या इमारतीमधील तीन फ्लॅट्सच्या आराखडय़ात कंगनाने बेकायदेशीररीत्या बदल केल्याबद्दल पालिकेने मार्च 2018 मध्ये ही नोटीस बजावली होती.
शेजारीशेजारी असलेल्या तीन वेगवेगळ्या फ्लॅट्समधील भिंती तोडून त्यांचा एकच फ्लॅट कंगनाने बनवला होता. महापालिकेने मंजूर केलेल्या योजनेचे हे उल्लंघन होते. त्याबद्दल पालिकेने तिला नोटीस बजावली होती.
पालिकेच्या नोटीशीला आव्हान देणारा अर्ज कंगनाने गेल्या डिसेंबरमध्ये दिंडोशी दिवाणी न्यायालयात दाखल केला होता. न्यायालयाने तो फेटाळून लावल्यानंतर कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र नंतर कंगनाने आपण फ्लॅटमध्ये केलेले बदल नियमित करण्यासाठी महापालिकेकडे अर्ज करणार असल्याचे सांगत ते अपिलही मागे घेतले होते.




























































