दिल्ली सरकारचे मंत्री कपिल मिश्रा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल, काय आहे प्रकरण?

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्या आतिशी मार्लेना यांचा एडिट केलेला व्हिडीओ शेअर केल्याबद्दल पंजाबमधील जालंधर पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणात दिल्ली सरकारचे मंत्री कपिल मिश्रा आणि काँग्रेस आमदारांची नावे आहेत. इकबाल सिंग नावाच्या व्यक्तीने केलेल्या तक्रारीवरून ही एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

दिल्ली विधानसभेत सिख गुरूंच्या ३५०व्या बलिदान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमावर चर्चेदरम्यान आतिशी यांनी केलेल्या भाषणाची एक छोटी व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या व्हिडाओमध्ये आतिशी यांनी गुरु तेग बहादूर साहिब यांच्यावर अपमानास्पद टिप्पणी केल्याचा दावा करण्यात आला होता. कपिल मिश्रा यांनी हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आणि भडकावणारे कॅप्शन लिहिले, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला.

जालंधर पोलिसांनी तक्रारदार इकबाल सिंग यांच्या तक्रारीवरून कारवाई करत हा व्हिडीओ पंजाबच्या फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे पाठवला. फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट झाले की, व्हिडिओमध्ये छेडछाड करण्यात आली आहे (edited आणि doctored). आतिशी यांनी भाषणात ‘गुरु’ हा शब्द उच्चारलाच नाही. व्हिडीओ जाणीवपूर्वक एडिट करून व्हायरल करण्यात आला, जेणेकरून आतिशींना सिख गुरूंचा अपमान केल्यासारखे दाखवता येईल. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे.