
यंदा वळवाच्या पावसाने म्हणावी तशी हजेरी लावली नाही. त्यामुळे कराड आणि पाटण तालुक्यांत पेरण्या लांबल्या होत्या. त्यातच ‘तौक्ते’ चक्रीवादळाने संपूर्ण महाराष्ट्राला तडाखा दिला. त्या वादळामुळे दोन-तीन दिवस मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर पावसाने उघडीप घेतल्याने शेतकऱयांनी युद्धपातळीवर भुईमूग, भात, सोयाबीन, मका ही पिके पेरून घेतली. सुमारे 80 टक्के पेरणी पूर्ण झाली. आता पुन्हा पावसाने उघडीप दिल्याने पेरणी झालेल्या शेत शिवारात सध्या कोळपणीची धांदल उडाल्याचे चित्र दिसून येत आहे.
‘तौक्ते’ चक्रीवादळानंतर कराड आणि पाटण तालुक्यांमध्ये दोन-तीन दिवसांच्या पावसाच्या उघडिपीच्या काळात पेरणी झाली. त्यानंतर पुन्हा सलग चार ते पाच दिवस पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे पिके उगवण्यास पोषक वातावरण तयार झाले. चार-पाच दिवस सलग पाऊस पडल्यानंतर पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेत शिवारात कोळपणीची एकच हातघाई उसळलेली दिसून येते. तसेच ज्यांची किरकोळ पेरणी राहून गेली आहे, तेदेखील ती पूर्ण करण्यासाठी गडबड करीत आहेत.
सध्या पिके कोळपणीसाठी पोषक वातावरण आहे. आता कोळपणीमुळे पुढे मोठय़ा प्रमाणात येणाऱया तणाला प्रतिबंध घालता येतो. कराड आणि पाटण तालुक्यांतील वाडय़ा-वस्त्यांवर सध्या कोळपणीची एकच धांदल सुरू असल्याचे दिसून येत आहे.
डोक्याने ओढणारा कोळप्या झाला कालबाह्य
ग्रामीण भागात सुरुवातीच्या काळात डोक्याने ओढणारा कोळप्याचा वापर जास्त प्रमाणात कोळपणीसाठी केला जात असे. या कोळप्याला दोन माणसांची आवश्यकता भासत असे. एक कोळपा ओढण्यासाठी आणि दुसरा तो कोळपा पुढे दाबण्यासाठी; परंतु सायकल कोळपा आल्यामुळे हे कोळपे हल्ली दिसेनासे झाले आहेत. सायकल कोळप्यामुळे एकच व्यक्ती पिकामध्ये कोळपू शकते. त्यामुळे सर्वत्र सायकल कोळप्याने शेतकरी पिके कोळपत असल्याचे दिसत आहे.
कोळपणीच्या माध्यमातून पिकातील जास्तीत जास्त तण काढण्यास मदत होत आहे. त्यामुळे भांगलणी करताना जास्त त्रास होत नाही. अजून एकदा कोळपणी झाली तर पीक चांगल्या पद्धतीने येण्यास मदत होईल.
– गयाबाई डाकवे, महिला शेतकरी.




























































