
सामना प्रतिनिधी। कराड
कराड शहरातील पालिकेजवळील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे हॉलमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस पथकाने छापा टाकून तब्बल 30 जणांना ताब्यात घेतले. यावेळी 5 लाख 810 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहरात अचानक करण्यात आलेल्या या मोठया स्वरुपातील कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
कराड येथील पालिकेच्या जवळील हॉलमध्ये तीनपानी पत्यावर मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलीस उपाधिक्षक ढवळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी स्वतः अधिकारी व कर्मचाऱ्यासह तेथे रविवारी सकाळी तेथे छापा टाकला. त्यामध्ये शहर व परिसरातील तब्बल 30 जण तीन वेगवेगळ्या ग्रुपमध्ये जुगार खेळत असल्याचे आढळुन आले.
अचानक कारवाई करण्यात आल्याने तेथे आलेल्यांची एकच धावपळ झाली. तर काहीजणांनी तेथून पळ काढण्याचाही प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून मोबाईल, रोख रक्कम व त्यांची वाहने असा तब्बल 5 लाख 810 रुपयांचाही मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे पोलीस उपाधिक्षक ढवळे यांनी सांगितले.





























































