कराडमधील 13 दुकाने सील, लॉकडाऊनचे नियम न पाळल्याने नगरपालिकेची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विकेंड लॉकडाऊन असून देखील कराड शहरात सुरू असणारी 13 दुकाने नगरपालिकेने सील केली. संबंधित व्यावसायिकांकडून 16 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गेल्या आठवड्यापासून विकेंड लॉकडाऊन पुन्हा सुरू केला आहे. शनिवारी व रविवारी दवाखाने व औषध दुकाने वगळता अत्यावश्यक सेवेतील अन्य दुकाने उघडण्यास निर्बंध आहेत. तरीही कराड शहरातील काही दुकाने सुरू होती. नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या लक्षात येताच नगरपालिकेने दुकाने सील करण्याची कारवाई हाती घेतली.

मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने कारवाई केली. सुमारे 13 दुकाने सील करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. विकेंड लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेत नसताना दुकाने उघडी ठेवल्याने दुकाने सील करून संबंधित व्यापाऱ्यांना सुमारे साडे सोळा हजारांचा दंड करण्यात आला आहे.