करमाड रेल्वे दुर्घटना ही मजुरांच्या निष्काळजीपणामुळे, प्राथमिक चौकशी अहवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संभाजीनगर आणि जालना शहरादरम्यान असलेल्या करमाड रेल्वे स्थानकाजवळ परप्रांतीय मजुरांना मालगाडीने चिरडले होते. 8 मे रोजी झालेल्या या अपघातामध्ये 16 मजुरांचा मृत्यू झाला होता. हे मजूर लॉकडाऊन काळात मध्य प्रदेशातील आपले गाव गाठण्यासाठी पायी निघाले होते. पहाटेच्या सुमारास दमल्याने ते रेल्वे रुळांवरच झोपले होते. या दुर्घटनेच्या चौकशीचे रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी तातडीने आदेश दिले होते. या चौकशीचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये मजुरांचा निष्काळजीपणा या अपघातासाठी जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

karmad-accident-deadbody

दै.सामनाचे संभाजीनगर आवृत्तीचे प्रतिनिधी राहुल डोल्हारे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी या अहवालाबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की हा काही दिवसांपूर्वी प्राप्त झाला आहे. ही दुर्घटना घडली तेव्हा लॉकडाऊनमुळे देशामध्ये संचारबंदी आणि जमावबंदी लागू करण्यात आली होती. रेल्वेसेवा फक्त मालवाहतुकीसाठी सुरू ठेवण्यात आली होती. यामुळे रेल्वे रुळ आणि परिसरात 5 पेक्षा जास्त जणांना एकत्र येण्यास कायदेशीरदृष्ट्या मनाई होती. या रुळांवरून चालत जाणं योग्य नव्हतं आणि अशा स्थितीत रेल्वेच्या कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचाऱ्याला अपघात टाळणं मुश्कील होतं असं अहवालात म्हटलं आहे. जर या मजुरांनी नियमावलीचे पालन केले असते आणि कोणत्याही परवानगी शिवाय त्यांच्या फॅक्टरीपासून गावाला चालत जाण्याचा निर्णय घेतला नसता तरच हा अपघात टाळता आला असता.

जमिनीवर विंचू-किडे चावतील म्हणून हे मजूर रुळावर झोपले होते (सर्व फोटो- हुसेन जमादार)

ही दुर्घटना 8 मे रोजी पहाटे 5.17 मिनिटांनी घडली होती. 20 मजुरांचा हा जत्था त्यांच्या गावाकडे पायी चालत निघाला होता. दमल्याने यातील 16 जण रुळांवरच झोपले होते तर बाकीचे रुळाच्या आजूबाजूला झोपले होते. जे मजूर रुळावर झोपले होते त्यांचा मालगाडीने चिरडल्याने जागीच मृत्यू झाला. रुळावर मजूर झोपल्याचे दिसल्यानंतर रेल्वेच्या चालकाला गाडी ताबडतोब थांबवणे शक्य नव्हते कारण तेव्हा रेल्वेगाडीचा वेग हा ताशी 70 किलोमीटर इतका होता असे अहवालात म्हटले आहे. सिकंदराबादचे रेल्वे अधिकारी राम कृपाल यांनी या दुर्घटनेची चौकशी केली होती.