कर्नाटकमध्ये धावती बस पेटली; सहा ठार

कर्नाटकच्या चित्रदुर्गमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. भरधाव जाणारा ट्रक रस्ता दुभाजकाला ओलांडून समोरून येणाऱया बसला जोरात धडकला. त्यामुळे बस पेटली आणि त्यात एका लहान मुलासह सहा प्रवाशांचा जळून कोळसा झाला. गुरुवारी मध्यरात्री 2.30 वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.

प्राप्त माहितीनुसार, बंगळुरू येथून एका स्लीपर बसमधून 32 जण गोकर्ण येथे जात होते. रस्त्याच्या पलीकडून येणाऱया ट्रकची धडक एवढी जोरात होती की, बसचा एका बाजूने चेंदामेंदा झाला, ट्रक थेट बसच्या डिझेल टाकीला धडकला. त्यामुळे डिझेलची गळती होऊन बस काही क्षणातच पेटली. प्रवाशांना बाहेर निघण्याची संधीच मिळाली नाही. 29 जणांनी ऑनलाईन तिकीट बुक केले होते. त्यापैकी एकाने प्रवास केला नाही, तर दोन जण मधून चढले होते. अपघातात एक लहान मूल आणि त्याच्या आईचा मृत्यू झाला. 12 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. मृतदेहांचा अक्षरशः कोळसा झाला आहे. त्यामुळे डीएनए चाचणीद्वारे त्यांची ओळख पटविण्यात येईल, अशी माहिती कर्नाटकचे पूर्व विभागाचे पोलीस महानिरीक्षक रविकांत गौडा यांनी दिली. या भीषण अपघातावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.