शेतकरी-कष्टकरी, उद्योगांसाठी कर्नाटक सरकारचा 1610 कोटींचा ‘बुस्टर डोस’; मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची मोठी घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘कोरोना’च्या लॉकडाऊनमुळे डबघाईला आलेल्या छोट्या-मोठ्या उद्योगधंद्यांसह शेतकरी-कष्टकर्‍यांसाठी कर्नाटक सरकारने 1610 कोटींचा ‘बुस्टर डोस’ दिला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी आज ही महत्त्वपूर्ण मोठी घोषणा केली. यामध्ये शेतकरी, फुल शेतकरी, धोबी, हातमाग कामगार, सलून व्यावसायिक, रिक्शा-टॅक्सी ड्रायव्हर आणि इमारत उद्योगातील कामगारांसाठी रोख रक्कमेसह आवश्यक मदत करण्यात येणार आहे. यामध्ये बजेटमध्ये जाहीर करण्यात आलेल्या 6 टक्के अबकारी करात मात्र आणखी 11टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.

कोरोनामुळे देशभरात गेल्या दीड महिन्यांपासून लॉकडाऊन असल्यामुळे अनेक छोटे-मोठे उद्योगधंदे डबघाईला आले आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील कामगारांच्या उदनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये कर्नाटकमध्ये रोजच्या उत्पन्नावर जीवन जगणारे शेतकरी, फुलं पिकवणारे शेतकरी, धोबी, टॅक्सी ड्रायव्हर आदींना मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर पॅकेज जाहीर करीत असल्याचे येडियुरप्पा यांनी म्हटले आहे. वीणकाम उद्योग, हातमाग व्यावसायिकांसाठी ‘विवर्स सन्मान योजना’ जाहीर करण्यात आली असून दोन हजारांची मदत हातमाग कारागिरांच्या खात्यात थेट जमा होणार आहे. याचा फायदा 54 हजार जणांना होणार आहे. सुमारे 16 लाख बांधकाम कर्मचार्‍यांच्या खात्यातही दोन हजारांची तातडीची मदत जमा करण्यात आली असून आणखी तीन हजारांची मदत थेट खात्यात जमा केली जाणार आहे. यामध्ये गरजूंसाठी जाहीर केलेल्या रकमेतून शिल्लक राहणार्‍या 80 कोटींच्या निधीचा उपयोग आपत्कालीन परिस्थितीसाठी वापरण्याचा निर्णयही कर्नाटक सरकारने घेतला आहे.

असा मिळणार ‘कोरोनाग्रस्तांना’ लाभ

  • लॉकडाऊनमुळे कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात होणार्‍या फुलशेतीचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे या व्यवसायाला हेक्टरी 25 हजारांची मदत जाहीर करण्यात येणार आहे. कर्नाटकमध्ये सुमारे 11678 हेक्टरवर फुलशेती केली जाते.
  • फळे, भाज्या उत्पादक शेतकरी त्यांचे उत्पादन लॉकडाऊनमुळे बाजारात नेऊ शकत नसल्याने नुकसान होत आहे. त्यांच्यासाठी देखील मदत विशेष मदत जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • शहरी आणि ग्रामीण भागात धोबी व्यवसाय करणार्‍यांसाठी पाच हजारांची तातडीची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा फायदा 60 हजार धोबी आणि 2 लाख 30 हजार सलून व्यावसायिकांनाही होणार आहे.

सात लाख रिक्शा-टॅक्सी चालकांना लाभ
कर्नाटकातील 7.7 लाख टॅक्सी आणि रिक्षा व्यावसायिकांसाठी प्रत्येकी पाच हजारांची तातडीची मदत देण्यात येणार आहे. वीणकामगारांसाठी 109कोटींच्या कर्ज योजना जाहीर करण्यात आली असून आतापर्यंत 29 कोटींचे वितरणही करण्यात आले आहे. शिवाय वीज ग्राहकांसाठी मासिक बिल ‘निश्चित’ रकमेचे करावे आणि हे बिल भरण्यासाठी दोन महिन्यांची मुभा देण्यात येईल. यामध्ये उद्योगांनाही दोन महिने दंडातून सवलत द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी दिले आहेत.