कर्नाटकातील एक उद्योगपती मंगळुरूतून रविवारी सकाळी अचानक बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मुमताज अली असे बेपत्ता उद्योगपतीचे नाव आहे. पहाटे 3 च्या सुमारास घरातून कार घेऊन गेलेले मुमताज अली घरी परतलेच नाहीत. मुमताज अली हे जनता दलाचे आमदार बीएम फारुक आणि काँग्रेसचे माजी आमदार मोहिउद्दीन बावा यांचे भाऊ आहेत. पोलीस बेपत्ता उद्योगपतीचा शोध घेत आहेत.
मंगळुरू येथील एका पुलाजवळ मुमताज अली यांची खराब झालेली BMW कार सापडली आहे. पहाटे 3 च्या सुमारास अली हे घरून निघाले. त्यानंतर 5 च्या सुमारास मंगळुरू येथील कुलूर पुलाजवळ त्यांनी कार थांबवली. यानंतर ते बेपत्ता झाले.
अली यांच्या मुलीने स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. कारला अपघात झाल्याच्या खुणा आहेत. अली यांनी पुलाजवळ कार उभी करून नदीत उडी घेतली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानुसार एसडीआरएफ आणि तटरक्षक दलाचे कर्मचारी नदीत अली यांचा शोध घेत आहे, असे मंगळुरूचे पोलिस आयुक्त अनुपम अग्रवाल यांनी सांगितले.