कासेवाडीत 12 वाहनांची तोडफोड ! चार अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात

रिक्षात बसण्यास मनाई केल्याने अल्पवयीनांनी भवानी पेठेतील कासेवाडी भागात दहशत माजवून 12 वाहनांची तोडफोड केली. अल्पवयीनांनी दगडफेक करून रिक्षा, टेम्पो, मोटार अशा 12 वाहनांच्या काचा फोडल्या. याप्रकरणी चार अल्पवयीनांना खडक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दाटीवाटीने घरे आहेत. अल्पवयीन मुले कासेवाडी भागात वसाहतीत राहायला आहेत. संबंधित भागात त्यामुळे या परिसरातील मुले रिक्षात गप्पा मारत थांबतात. शुक्रवारी (3 ऑक्टोबर) मुले रात्री रिक्षात गप्पा मारत होती. त्यावेळी एका रिक्षाचालकाने त्यांना रिक्षात बसण्यास मनाई केली. या कारणावरून अल्पवयीन मुले चिडली. कासेवाडी भागातील रहिवासी पिंपळमळा परिसरात वाहने लावतात. मध्यरात्री अल्पवयीनांनी पिंपळमळा परिसरात लावलेल्या रिक्षा, टेम्पो, मोटारीच्या काचांवर गज मारले, तसेच दगडफेक करून काचा फोडल्या.

घटनेमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये घबराट उडाली. रहिवाशांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. खडक पोलिसांनी चार अल्पवयीनांना ताब्यात घेतले. रिक्षाचालकाने अल्पवयीनांना रिक्षात बसण्यास मनाई केल्याने वाहनांची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिली. शहर परिसरात किरकोळ कारणावरून वाहनांची तोडफोड करण्याच्या घटना वाढल्या आहेत. यापूर्वी नाना पेठेतील मंजुळाबाई चाळ, तसेच धनकवडी, बिबवेवाडी, औंध भागात वाहनांची तोडफोड करण्याच्या घटना घडल्या होत्या.