कशेडी घाटाच्या पर्यायी भुयारी मार्गाचे काम रखडले; अपघातांचा धोका कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई गोवा महामार्गावरील अवघड आणि धोकादायक कशेडी घाटाला पर्याय म्हणून तयार करण्यात येत असलेल्या भुयारी मार्गाचे काम रखडल्याने कशेडी घाटातील अपघातांचा धोका कायम आहे. एक दोन महिन्याआड या घाटात होणाऱ्या जीवघेण्या अपघातांमध्ये अनेकांचा बळी जाऊ लागला असल्याने हा घाट दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनू लागला आहे. घाटात होणारे जीवघेणे अपघात लक्षात घेत बांधकाम विभागाने एकतर घाटरस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे किंवा रखडलेले भुयारी मार्गाचे काम त्वरित पूर्ण करून भुयारी मार्ग वाहतुकीस खुला करावा अन्यथा या घाटात आणखी कितीजणांना आपला बळी द्यावा लागेल हे सांगणे कठीण आहे.

मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाची रचना अतिशय विचित्र आहे. सह्याद्री पर्वतांच्या उपरांगांमध्ये तयार करण्यात आलेला हा घाट खेड तालुक्यात सात किलोमीटर तर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत 13 किलोमीटर इतका आहे. गोव्याकडून मुंबईच्या दिशेने जाताना खेड तालुक्याच्या हद्दीत असलेला घाट हा नागमोडी वळणे आणि चढणीचा तर तर पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत येणार घाटाचा भाग हा नागमोडी वळणे आणि तीव्र उताराचा आहे. दोन्ही बाजूच्या घाट सेक्शनमध्ये खेड तालुक्याच्या हद्दीत डाव्या बाजूला तर पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत उजव्या बाजूला खोल दरी आहे. त्यामुळे या घाटात वाहने हाकताना चालकाचा जरा जरी अंदाज चुकला तरी कपाळमोक्ष हा ठरलेलाच. त्यामुळे या घाटात वाहने हाकताना चालकांची अक्षरशः कसोटी असते.

कशेडी घाटात होणारे जीवघेणे अपघात रोखण्यासाठी महामार्ग चौपदरीकरणादरम्यान या घाटाला पर्यायी मार्ग म्हणून भुयारी मार्ग बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. या भुयारी मार्गासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध झाल्यानंतर कामाचा ठेका घेतलेल्या रिलायन्स इन्फ्रा या ठेकेदार कंपनीने मार्च २०१९ मध्ये रत्नागिरीचे तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते कामाचा नारळ फोडला. 2021अखेर भुयारी मार्गाचे काम पूर्ण केले जाईल असे त्यावेळी ठेकेदार कंपनीकडून सांगण्यात आले होते. मात्र 2023 उजाडला तरी हे काम पूर्ण झाले नसल्याने आजही धोकादायक घाटातूनचं वाहतूक सुरु आहे. भुयारी मार्गाचे काम सुरु होण्याआधी घाट रस्त्याची योग्य प्रकारे दुरुस्ती केली जात होती, घाटात पडलेलेले खड्डे महामार्ग बांधकाम विभागाकडून तात्काळ बुजविले जात होते मात्र भुयारी मार्गाचे काम सुरु झाल्यापासून घाटाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने घाटातील अपघातांचा धोका आणखीनच वाढला आहे.

पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत येणाऱ्या घाट सेक्शनमध्ये काही वळणे अपघाताची हॉटस्पॉट मानली जातात. पोलीस प्रशासन आणि बांधकाम विभागाने सर्वे करून खेड आणि पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत काही ठिकाणे ही डेंजर स्पॉट ठरवली आहेत. मात्र या ठिकाणी अपघात रोखण्यासाठी काहीच उपाययोजना केली गेले नसल्याने हेच डेंजर स्पॉट्स अपघाताचे कारण ठरू लागले आहेत.

पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत येणाऱ्या घाट सेक्शनमध्ये अनेक डेंजर स्पॉट आहेत. यातील एका डेंजर स्पॉटवर तर आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. 7 नोव्हेंबर 2022 रोजी या डेंजर स्पॉटवर झालेल्या भीषण अपघातात तीन महाविद्यालयीन विद्यार्थिनींसह चार जणांचा मृत्यू झाला होता. या विद्यार्थिनी रिक्षाने खेड येथे एका परीक्षेसाठी आल्या होत्या. परीक्षा आटोपून त्या परतत असताना त्या डेंजर स्पॉटवर वाळूने भरलेला डंपर त्यांच्या रिक्षावर पलटी झाला. या अपघातात रिक्षाचालकासह त्या तिन्ही विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. या भीषण अपघातानंतर तरी बांधकाम विभागाने त्या ठिकाणी आवश्यक ती उपाययोजना करणे गरजेचे होते. मात्र, अद्याप या घाटात अपघात रोखण्यासाठी कोणतीच उपाययोजना केली गेली नसल्याने या ठिकाणी अपघातांची मालिका सुरूच आहे.

कशेडी घाटात होणारे जीवघेणे अपघात रोखायचे असतील तर या घाटाला पर्यायी मार्ग म्हणून तयार करण्यात येत असलेल्या भुयारी मार्गाचे रखडलेले काम त्वरित पूर्ण करण्याशिवाय पर्याय नाही. या भुयारी मार्गाचे काम पूर्ण करून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला तरच या घाटातील अपघातांना आळा बसेल अन्यथा कशेडी घाटात मुक्तपणे संचार करत असणारे यमराज आणि त्यांचे दूत आणखी कितीजणांचा बळी घेतील याचा विचारही न केलेला बरा असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही