कशेडी बोगद्याचे काम प्रगतीपथावर, निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न

906

मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय म्हणून खोदण्यात येत असलेल्या बोगद्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. कामाचा वेग पाहता बोगद्याचे काम निर्धारित वेळेत पूर्ण होण्याची शक्यता आहे. महामार्गावरील 3.44 किलोमीटर लांबीचा या बोगद्यामुळे नागमोडी वळणाचा अवघड कशेडी घाट काही मिनिटात पार करता येणार आहे.

मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाट हा अतिशय धोकादायक घाट मानला जातो. रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत 7 किलोमीटर आणि रायगड जिल्ह्याच्या हद्दीत 9 किलोमीटर असा एकूण 16 किलोमीटरचा घाट पार करताना चालकांचा कस लागतो.घाटात वारंवार होणार्‍या जीवघेण्या अपघातांना आळा बसावा या दृष्टीने नागमोडी वळणाच्या घाटाला  पर्याय म्हणून बोगदा खोदण्याचा निर्णय घेण्यात आला.

रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत खवटी गावाच्या हद्दीतून सुरु होणार हा भुयारी मार्ग रायगड जिल्ह्यातील पोलादपूर भोगाव खुर्द या गावाजवळ  पुन्हा महामार्गाला मिळणार आहे. खेड तालुक्यातील कशेडी येथे गेल्यावर्षी बोगदा खोदण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली असून रत्नागिरी जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते या कामाचे उदघाटन करण्यात आले होते. सद्यस्थिती खेड बाजूकडून 730 मीटर अंतराचा तर पोलादपूर तालुक्यातील भोगाव येथून 500 मीटर चा भुयारी मार्ग तयार झाला आहे. दोन्हीही बाजूने खोदाईचे काम युद्धपातळीवर सुरु  असल्याने 2021 वर्षाच्या प्रारंभी हा भुयारी मार्ग पुर्णत्वास जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या या मार्गाचे  चौपदरीकरण सुरू आहे. मात्र  या अवघड आणि नागमोडी वळणांच्या घाटात  चौपदरीकरण शक्य नसल्याने घातला पर्याय म्हणून भुयारी मार्ग तयार कारण्यात येत आहे. या कामासाठी  44१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

3.44 किलोमीटरच्या भुयारी मार्गात आपत्कालामध्ये उपयुक्त असलेले वायुविजन सुविधेचे एक भुयारदेखील समाविष्ट असून पोलादपूर बाजूच्या पहिल्या अर्धा किमी. अंतराच्या टप्प्यामध्ये दोन्ही भुयारी मार्गांना जोडणार्‍या कनेक्टिव्हिटीचा भुयारी मार्ग तयार झाला आहे, भुयारी मार्गावर एखादा अपघात झाला तर अपघातग्रस्त वाहनांना बाहेर काढण्यासाठी किंवा एखाद्या वाहनाला यु टर्न घ्यायचा असेल तर या  कनेक्टिव्हिटी भुयारीमार्गाचा उपयोग होणार आहे. यासोबतच आपतकालामध्ये उपयुक्त असलेले वायुविजन सुविधा देखील यामध्ये समाविष्ट आहे.

2019 च्या  नोव्हेंबरमध्ये खेड तालुक्यातील खवटी या गावाजवळ सुरू झालेले हे काम एप्रिल 2021  पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे  अशी  माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक नवले यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या