
पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी आरजी कार बलात्कार-हत्या प्रकरणावरून तृणमूल काँग्रेसवर दबाव वाढला होता. मात्र आता एका व्हिडीओ पोस्ट करत तृणमूल काँग्रेसकडून आरोप करण्यात आला आहे की, या प्रकरणी निघालेल्या निषेध रॅलीमध्ये फुटीरतावादाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या गेल्या. X वर व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या तृणमूलचे प्रवक्ते रिजू दत्ता यांनी दावा केला की यामधून स्पष्ट संकेत मिळत आहे की, हे आंदोलन ‘डाव्या विचाराच्या समर्थकांनी हायजॅक केलं आहे’.
‘या देशद्रोही किंवा शहरी नक्षलवाद्यांना पीडितेला न्याय मिळवून देण्यात बिलकूल रस नाही, त्यांना फक्त त्यांचा हिंदुस्थानच्याविरोधी अजेंडा राबवायचा आहे! मी अगदी स्पष्टपणे सांगू इच्छितो – कश्मीर हिंदुस्थानचा अविभाज्य भाग आहे आणि नेहमीच राहिल!’, असे X वरील पोस्ट मध्ये त्यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणतात की,’मी, अशा रॅलीत सहभागी होणाऱ्या कोलकात्यातील सर्व स्त्री-पुरुषांना नम्र विनंती करतो…कृपया त्यांच्या फंदात पडण्यापूर्वी आणि नकळत अशा देशविरोधी प्रचाराला प्रोत्साहन देण्यापूर्वी दहा वेळा विचार करा!’
पोस्ट सोबत असलेल्या व्हिडीओमध्ये काही तरुण आणि तरुणी कश्मीरसाठी ‘आझादी’च्या घोषणा देताना दिसत आहेत. NDTV ने हा व्हिडीओ वापरला असला तरी त्याची पुष्टी करू शकत नसल्याचे म्हटले आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाला असून यासंदर्भात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत अज्ञात व्यक्तींविरुद्ध कोलकाता येथील पाटुली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरजी कार रुग्णालयामध्ये 9 ऑगस्ट रोजी झालेल्या बलात्कार-हत्येबद्दलच्या राज्यव्यापी निदर्शनांमध्ये मुख्यतः ‘आम्हाला न्याय हवा’ ही घोषणा दिसून आली. पण त्याच वेळी काही भागात’आझादी’च्या घोषणा दिल्याचे दिसून आल्याचे एनडीटीव्हीच्या सूचना दिल्या आहेत.