वादळी वाऱयात अडकला तरीही हिंमत सोडली नाही, कश्मिरी तरुणाने माऊंट एव्हरेट केला सर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातील सर्वात उंच शिखर ‘माऊंट एव्हरेस्ट’वर चढाई करण्याची ओढ समस्त गिर्यारोहकांना असते. काहींचे स्वप्न पूर्ण होते, काहींचे होत नाही. जम्मू-कश्मीरच्या कुलगाम जिह्यातील महफूज इलाही हाजम या 26 वर्षीय तरुणाने माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न साकार केले आहे. अथक मेहनतीच्या जोरावर महफूजने ही मोहीम फत्ते केली. वादळी वाऱयांचा सामना करत महफूजने हे ध्येय गाठले आहे.

पहेलगाम येथील जवाहर इन्स्टिटय़ूट ऑफ माऊंटनियरिंग अँड विंटर स्पोर्ट्स येथे महफूज हाजम हा तरुण सिव्हिलियन इन्स्ट्रक्टर म्हणून काम करतो. 1 जून रोजी सकाळी त्याने माऊंट एव्हरेस्टवर 8849 मीटरवर चढाई केली. या मोहिमेचे नेतृत्व कर्नल एल.एस. थापा यांनी केले. थापा हे प्रसिद्ध गिर्यारोहक आहेत. त्यांनी दोन वेळा माऊंट एव्हरेस्ट सर केला आहे. महफूजसाठी ही मोहीम सोपी नव्हती. पर्वतावरील वादळी वाऱयांमुळे तो कॅम्प-2मध्ये एका टीमसोबत 10 दिवस अडकून पडला होता. मात्र त्याने जिद्दीने मोहीम पूर्ण केली. कश्मिरी युवकांनी साहसी खेळांमध्ये सहभागी व्हायला पाहिजे, अशा भावना महफूजने यानिमित्ताने व्यक्त केल्या.