
>> सुरेश चव्हाण
महात्मा गांधीजींची प्रेरणा व मार्गदर्शनानुसार ग्रामीण स्त्रिया व मुलींचा विकास साधण्यासाठी `कस्तुरबा गांधी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट’ची स्थापना करण्यात आली. गांधीजी आणि कस्तुरबा यांच्या तत्त्वनिष्ठेवर आधारलेली शिस्त व कार्यप्रणाली अनुसरून समर्पित भावनेने या ट्रस्टमधील सेविकांमार्फत गेली 80 वर्षं भारतातील 22 राज्यांतील ग्रामीण भागात सुरू असलेल्या 450 केंद्रांमधून हे सेवाकार्य अखंड सुरू आहे.
महात्मा गांधींनी 1945 साली आपल्या निष्ठावंत व अद्वितीय अशा जीवनसाथीच्या स्मरणार्थ `कस्तुरबा गांधी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट’ या महत्त्वपूर्ण संस्थेची स्थापना केली. जनतेने स्वयंस्फूर्तीने व उदार भावनेने कस्तुरबांच्या पुण्यस्मरणासाठी निधी गोळा करून गांधीजींना अर्पण केला. गांधीजींनी ठरवले की, कस्तुरबांचे योग्य स्मारक व्हायचे असेल तर ते ग्रामीण स्त्रिया व मुली यांच्या विकासाचे प्रतीक असणे आवश्यक आहे. यासाठी त्यांनी या ट्रस्टची स्थापना करून त्याच्या कामकाजाची पूर्ण आखणी करून दिली. तेव्हापासून म्हणजे गेली 80 वर्षं कस्तुरबा गांधी ट्रस्टचे हे सेवाकार्य ग्रामीण भागात अखंड सुरू आहे.
कस्तुरबांचा जन्म पोरबंदर (गुजराथ) येथे 1869 साली झाला व 1882 मध्ये त्यांचा विवाह मोहनदास करमचंद गांधी यांच्याशी झाला. कस्तुरबांनी गांधीजींच्या खांद्याला खांदा लावून स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला. जगातल्या `प्रथम अहिंसक सत्याग्रही’ म्हणून त्यांची गणना इतिहासात केली गेली आहे. 1942च्या `चले जाव’ आंदोलनात कस्तुरबांनीही उडी घेतली आणि परिणामी त्यांना अटक करण्यात आली व पुणे येथील आगाखान पॅलेसच्या कारागृहात बंदी म्हणून ठेवण्यात आले. तिथेच 22 फेब्रुवारी 1944 या दिवशी त्यांचा अंत झाला.
गांधीजींच्या तत्त्वनिष्ठेवर आधारित असलेली शिस्त व कार्यप्रणालीस अनुसरून समर्पित भावनेने कस्तुरबा ट्रस्टच्या सेविका हे काम आजही तन्मयतेने करत आहेत. या कामाची सुरुवात स्वातंत्र्यपूर्व काळात झाली आहे, ही गोष्टपण लक्षात ठेवण्याजोगी आहे. स्वातंत्र्य जरी मिळाले तरी या कामाची गरज अजूनही तितकीच किंबहुना अधिकच भासते आहे. बदलत्या परिस्थितीत समस्या वाढल्या आहेत आणि समृद्धीच्या सोबत असणारी सर्व संकटे समाजाला ग्रासून टाकत आहेत. ग्रामीण जनता अजूनदेखील या विकासाच्या वाटेपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे `सुसंस्कारीत माणूस’ घडवण्याचे काम अजून रेंगाळलेलेच असल्याचे स्पष्ट दिसते. अशा वेळी कस्तुरबा ट्रस्ट करत असलेल्या कामाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
भारतात कस्तुरबा गांधी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टचे काम 22 राज्यांत पसरले असून 450 केंद्रांमार्फत हे काम सातत्याने सुरू आहे. यातील काही केंद्रे तर अत्यंत दुर्गम आदिवासी भागात व अविकसित वस्त्यांमध्ये काम करत आहेत. कस्तुरबा ट्रस्टच्या प्रशिक्षित सेविका ज्यांना `ग्रामसेविका’ असेही म्हटले जाते. त्यांच्या सेवेमुळे आज ट्रस्ट भक्कम पायावर उभा आहे. या सेविका सदैव सेवेसाठी तत्पर असतात. आडगावातील केंद्रांमध्ये त्या बालवाडी, अंगणवाडी, पाळणाघरे, आरोग्य केंद्रे, शेती, दुग्धव्यवसायाचे मार्गदर्शन अशा नेहमीच्या योजनांबरोबरच समाजपरिवर्तनाचे काम म्हणून समाजशिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती असे महत्त्वाचे उपामही राबवतात. आधुनिक काळात महिलांच्या विकासासोबतच त्यांचे आर्थिक व सामाजिक सबलीकरण करणे अनिवार्य असल्याने त्यांना ग्रामपंचायती, पतपेढय़ा, बँका, सोसायटय़ा यांच्यासोबतही काम करावे लागते. अशा रीतीने सर्व दृष्टीने सक्षम असलेली महिलाच कस्तुरबा ट्रस्टची सेविका बनण्यास पात्र ठरते. याचबरोबर निस्वार्थ, निरपेक्ष जीवन, साधी राहणी याचीही उपासना त्यांना करावी लागते. ही सर्व कामे करत असताना प्रत्येक सेविकेला `ग्रामस्वराज्या’ची ओढ असावी लागते. आपत्कालात दंगेधोपे असलेल्या ठिकाणी तसेच भूकंप, महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमध्ये त्यांना धावून जावे लागते.
महाराष्ट्रात पुण्यापासून 32 किलोमीटरच्या अंतरावर सासवड येथे कस्तुरबा ट्रस्टचे प्रांतिक कार्यालय आहे. येथे अनेक प्रकारचे विकासाभिमुख कार्पाम व योजना अमलात आणल्या जातात तसेच सर्व केंद्रांना मार्गदर्शन व प्रशिक्षणही दिले जाते. `बालग्राम’ या चळवळीशी संलग्न असलेली तीन बाल सदने, निराधार अनाथ मुलींची घरकुले येथे आहेत. तसेच स्त्रियांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्याच्या योजनाही येथे राबवल्या जातात. त्यातील काही योजना पुढीलप्रमाणे आहेत.
1) बालगृह : यामध्ये निराधार बालिकांना वसतीगृहात राहून शिक्षण दिले जाते व त्यांचा व्यक्तिगत विकास ध्यानात घेऊन इतर विषयांचे प्रशिक्षणही दिले जाते. 2) प्रेमाश्रम : ट्रस्टच्या निवृत्त सेविकांचा हा निवास आहे. यात राहून त्या आपले उर्वरित आयुष्य सुखासमाधानाने जगत आहेत. ट्रस्टतर्फे खेडय़ापाडय़ातून ज्या स्त्रिया काम करत आहेत त्यात मुख्यत्वे स्त्रियांचे आरोग्य, स्वावलंबन, साक्षरता, गर्भावस्थेपासून मुलांचे भरण-पोषण, प्रसूती व संपूर्ण ग्रामसेवेची इतर कामे करण्यासाठी ज्या ग्रामीण भगिनींनी आपली उभी हयात खर्च केली अशा त्यागी सेविकांना `निवारा’ म्हणून `प्रेमाश्रमा’ची संकल्पना विकसित होऊन एक सुंदर शिल्प निर्माण झाले. आज या संपूर्ण इमारतीत निवृत्त सेविका निराधार बालिकांच्या समवेत आपले उर्वरित जीवन सुखी व शांतिमय वातावरणात व्यतीत करत आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था कस्तुरबा ट्रस्टने केली आहे. सासवड येथील ट्रस्टचे संपूर्ण व्यवस्थापन कस्तुरबा ट्रस्टच्या महाराष्ट्र केंद्राच्या प्रतिनिधी शेवंताबाई चव्हाण समर्थपणे सांभाळत आहेत. महाराष्ट्रात अमरावती, चंद्रपूर, कोल्हापूर, मालगुंड – जि. रत्नागिरी येथेही या ट्रस्टच्या शाखा आहेत. अमरावती जिह्यातील मेळघाट तालुक्यातील धारणी येथील केंद्र ट्रस्टच्या स्थापनेपासून कार्यरत आहे.
मेळघाटातील बालमृत्यूंचे प्रमाण व कुपोषित बालके ही एक गंभीर समस्या आहे. यावर उपाय म्हणून ट्रस्टने गावागावातून तरुण मुलींना संघटित करून त्यांना आवश्यक असलेले प्रशिक्षण देऊन गावात `पाडा वर्कर’ म्हणून नियुक्त केले आहे. त्यामुळे कोरकू व भिल्लं या आदिवासी जमातीत जागृती निर्माण होऊन त्यांच्या जीवनमानात सकारात्मक सुधारणा घडत आहे. हे सर्व उपाम रचनात्मक स्वरूपाचे असून ते राबविण्यासाठी ट्रस्टकडे पुरेशी साधनसंपत्ती नाही तरीही गेली 80 वर्षं पैसा व प्रसिद्धीच्या मागे न जाता ट्रस्टचे काम अव्याहतपणे सुरू आहे.