कवठे येमाई परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट, शेतीपंप, केबल चोरीच्या प्रकाराने शेतकरी धास्तावले

शिरूरच्या पश्चिम भागातील कवठे येमाई व परिसरातील बहुसंख्य शेतकरी सध्यस्थितीत सर्वच बाजूंनी अत्यंत आर्थिक संकटात होरपळत असताना मागील 15 ते 20 दिवसांपासून भूरट्या चोरांकडून शेतीपंप व तांब्याच्या केबल चोरीचे प्रकार वारंवार होत असल्याने या भुरट्या चोरांचा उपद्रव सुरु झाला आहे. यामुळे रब्बी हंगाम सुरु असताना शेतकऱयांना नाहक भुर्दंड बसत असल्याचे चित्र शिरूर तालुक्यातील कवठे येमाई परिसरात पाहावयास मिळत आहे.

मागील महिन्यात कवठे येमाई,फत्तेश्वर बंधारा,घोडनदी परिसरातील बबन गावडे यांचा विद्युत पंप व त्याला जोडलेल्या तांब्याच्या केबल यांना टार्गेट करीत चोरून नेल्याचा प्रकार ताजा असतानाच आता पोळ वस्तीतील परशुराम पोळ यांची विद्युत मोटार व तांब्याची केबल दिवसाच चोरून नेण्याचा प्रकार घडला आहे.त्यांच्या मोटार पॅनल बॉक्सची ही मोडतोड ही या चोरटयांनी केली आहे. साधारणपणे ३ जणांची ही टोळी असून एकाच मोटारसायकलवरून येत त्यांनी चोरी केल्याचा संशय पोळ यांनी व्यक्त केला आहे तर परिसरात खेळणाऱ्या मुलांनी त्यांना दुपारच्या सुमारास विहीर परिसरात पाहिल्याचे त्यांनी सांगितले.

चोरीच्या उपद्रवामुळे सध्या सर्व बाजूंनी आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱयांना नाहक आर्थिक भूर्दंड व मनःस्तापास सामोरे जावे लागत आहे. आता भुरट्या चोरांचा शेती अत्यावश्यक साहित्य चोरण्याचा उपद्रव सुरु झाल्याने या चोरट्यांची मोठीच दहशत निर्माण झाली आहे. पोलिसांनी अशा भुरट्या चोरांचा छडा लावून त्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी शिरूर पंचायत समितीचे सदस्य डॉ.सुभाष पोकळे, कवठे येमाईचे माजी सरपंच दीपक रत्नपारखी, बळीराजा शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष जयवंतराव भाकरे, दत्तात्रय मुसळे,बाबाजी रासकर,बबन गावडे,महेश रोहिले, परशुराम पोळ व शेतकऱ्यांतून होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या