
सामना ऑनलाईन । मुंबई
नॅशनल लायब्ररी वांद्रे आणि ज्योती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच वांद्रे इथे काव्योत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. मराठी शाळांचं घटतं प्रमाण लक्षात घेऊन मराठी भाषेविषयीची आस्था वाढावी, भाषेला लाभलेली समृद्ध परंपरा विचारात घेऊन आपण मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन करायचा आणि मराठी भाषेला बहुमान मिळवून देण्यासाठी पुरेसा प्रयत्न झाला पाहिजे, असे सांगून किमान राजभाषा सप्ताह म्हणून तरी काही मराठी पुस्तकं विकत घ्या …असे आवाहन करत अशोक नायगावकर यांनी काव्योत्सवात बोलताना अतिशय पोट तिडकिने मनातली खंत व्यक्त केली.
तर काव्योत्सवाच्या अध्यक्षा डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी काव्योत्सवाच्या निमित्ताने कवितेचे वेगवेगळे आवाज मिळून साहित्याचा प्रवाह खळाळता राहणार आहे.तसेच कविता समजून घेण्यासाठी फक्त वाचार्थ महत्वाचा नाही. तर कवितेच्या गाभ्यापर्यंत पोहचले पाहिजे. कविता जगण्याची निकड वाटली पाहिजे.आणि कवितेची चळवळ व्यापक व्हायला पाहीजे आणि त्यासाठी असे काव्योत्सव साहित्य जगतात महत्वाचे कार्य करतात. असे ठाम प्रतिपादन काव्योत्सवाच्या व्यासपीठावरून बोलताना केले.
या कार्यक्रमाचे ओघवते सूत्रसंचालन अनुराधा म्हापणकर यांनी केले, तर आभार सिद्धी आंबेकर यांनी मानले. या काव्योत्सवात ज्योती फाऊंडेशनच्या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. याप्रसंगी बोलताना डिजिटल डिटॉक्सच्या कार्यकारी निर्मात्या ममता सरदेसाई म्हणाल्या की, आजच्या काव्योत्सवाच्या विधायक कार्यासाठी एकत्र आलेल्या सर्व महिला हे स्त्रीशक्तीचे उत्तम प्रदर्शन आहे. असे बोलून त्यांनी टीम ज्योती फाऊंडेशन आणि नॅशनल लायब्ररीचे कौतुक केले. तर ज्योती कपिले यांनी आपल्या ज्योती फाऊंडेशनद्वारे गदिमा, पुलं आणि बाबूजी ह्या महात्रयींच्या जन्म शताब्दीवर्षात काव्योत्सव हा सरस्वतीचा उत्सवाची सुरुवात करून कवींना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेले आहे असे गौरवोद्गार पु.ल. देशपांडे कला अकादमीच्या कार्यकारणी सदस्य रेश्मा कारखानीस यांनी काढले.
ज्योती फाऊंडेशनच्या अध्यक्षा ज्योती कपिले यांनी नवकवींना व्यासपीठ तर जाणत्यांचा सन्मान असणारा हा काव्योत्सव उपक्रम, विविध जिल्ह्यात राबवायचा मानस आहे, असे सांगितले. या उपक्रमास नॅशनल लायब्ररीचे मोठे सहकार्य लाभले हे नमूद केले. सदर काव्योत्सवात एकूण 75 कवींची उपस्थिती होती. शालेय विद्यार्थी, युवा कवी, कविता, गजल, परिसंवाद, अनुवाद आणि स्पर्शांकीत ब्रेल अशी कवितेची निरनिराळी सत्रे पार पडले. कवयित्री अनुराधा नेरुरकर, संगीता अरबुणे, मंदाकिनी पाटील, साहित्य अनुवादक जयश्री हरी जोशी, गीतकार मंदार चोळकर ह्यांनी ह्या सत्रात सहभाग नोंदवला. या सर्वात लक्षवेधी ठरले ते अंध कवींचे काव्यवाचन. अशोक नायगावकर यांच्यासह सर्व कवी, रसिकांनी उत्स्फूर्तपणे उभं राहून त्यांना दाद दिली.




























































