केडीसीसीचे 78 शिपाई झाले क्लार्क, मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते दिवाळी भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिपाई पदावरील कर्मचारी तसेच कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस अशा 78 जणांना बँकेने क्लार्क पदाची नियुक्ती पत्रे दिली.बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे.याबाबतची नियुक्ती पत्रेही मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते देण्यात आली.

दहा वर्षापूर्वी कंत्राटी शिपाई म्हणून सेवेत रुजू झालेल्या या कर्मचाऱ्यांचा पगार पाहून आम्हालाही लाज वाटायची.दोन वर्षांपूर्वी त्यांना शिपाई पदावर कायम सेवेत घेतली होते.त्यातील पदवीधरांची क्लार्क म्हणून नियुक्ती व्हावी,अशी त्यांची मागणी होती.ती आता पुर्ण झाल्याने समाधान वाटत असल्याचे मंत्री मुश्रीफ म्हणाले.

दरम्यान बँकेवर पाच वर्षापासून असलेल्या संचालक मंडळाच्या आधी नऊ वर्ष प्रशासकाची कारकीर्द होती.बँकेवर लागलेला तो एक काळा डाग होता.पाच वर्षांपूर्वी मोठ्या विश्वासाने या बँकेचे नेतृत्व आपल्याकडे आले.यावेळी संचालक मंडळाने ठरविल्यानुसार राज्यातच नव्हे तर सबंध देशात ही बँक अग्रेसर आणली.कर्मचाऱ्यांचे सर्व प्रलंबित निर्णय निकालात काढले.कर्मचाऱ्यांनीही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने काम केले त्यातूनच बँकेने ६००० कोटी ठेवींचा टप्पा ओलांडल्याचा आवर्जून उल्लेखही मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी केला.

शंभर कोटी नफेचे उद्दिष्ट
जिल्हा बँकेच्या आजच्या वैभवात कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे.त्यांच्या भरवशावरच ३१ मार्च २०२१ अखेर १०० कोटी नफा व ७००० कोटी ठेवीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.त्याच्या पूर्ततेसाठी कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे कसोशीने प्रयत्न करावेत असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी केले.यावेळी संचालक मंडळातील ज्येष्ठ संचालक अनिल पाटील,आर.के.पोवार, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर,भैय्या माने, असिफ फरास,संतोष पाटील,रणजितसिंह पाटील , बी.आर.पाटील,ए.बी.परुळेकर,भगवान पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.