
कल्याण-डोंबिवली महापालिकेने कचरा संकलनासाठी सुमित एल्कोप्लास्ट या खासगी कंपनीला कंत्राट दिले आहे. या कंपनीकडून कचरा उचलण्यासाठी 50 हून अधिक गाड्या खरेदी केल्या आहेत. मात्र या गाड्या गेल्या दोन महिन्यांपासून विना आरटीओ नोंदणी आणि नंबर प्लेटशिवाय रस्त्यावर धावत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. एरवी नंबर प्लेट नसेल तर आरटीओ अवाचे सवा दंड आकारते. मात्र दोन महिन्यांपासून 50 हून अधिक गाड्या कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यावर धावत असूनही काहीच कारवाई होत नाही. या कचरा संकलन ठेकेदाराचा ‘आका’ कोण आहे, संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
चेन्नई शहरातील स्वच्छता पॅटर्नच्या धर्तीवर केडीएमसीकडून घनकचरा व्यवस्थापन राबवण्यात येत आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करून सुमित एल्कोप्लास्टला ठेका देण्यात आला आहे. या खर्चाचा बोजा अतिरिक्त कराच्या स्वरूपात नागरिकांवर लादला आहे. केडीएमसीने घनकचरा व्यवस्थापनाचे कंत्राट दिलेली सुमित कंपनी ही टेंडर मिळाल्यानंतरच स्थापन झाली होती. तिला केवळ पेस्ट कंट्रोल आणि हाऊसकिपिंगचा अनुभव असूनदेखील कचऱ्यासारखे महत्त्वाचे काम सोपवण्यात आले. मद्य घोटाळ्याप्रकरणी झारखंड पोलिसांनी या कंपनीचे मालक अमित साळुंखे यांना अटक केली होती. तसेच कंपनीतील काही एजंटांनी कामावर घेण्याच्या मोबदल्यात कामगारांकडून पैशांची मागणी केल्याचा प्रकारही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी नुकताच उघडकीस आणला होता. आता या कंपनीच्या कचरा संकलन करणाऱ्या गाड्या विना आरटीओ नोंदणी आणि नंबर प्लेटशिवाय धावत असल्याचा पर्दाफाश शिवसैनिक केलास सणस यांनी केला आहे.
ही मेहेरबानी कशासाठी?
कचरा संकलन करणाऱ्या 50 हून अधिक गाड्या रस्त्यावर आहेत. त्यामुळे पालिका प्रशासन आणि कल्याण आणि डोंबिवली वाहतूक शाखेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सामान्य नागरिकांची गाडी नंबर प्लेटशिवाय आढळल्यास वाहतूक शाखा त्वरित दंडात्मक कारवाई करते, मग सुमित कंपनीच्या गाड्यांवर एवढी मेहरबानी का? असा सवाल करत कैलास सणस यांनी वाहतूक शाखेच्या भोंगळ कारभारवर ताशेरे ओढले आहेत.