
सामना ऑनलाईन । पुणे
इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पुण्याचा मराठमोळा क्रिकेटपटू केदार जाधव याची ‘टीम इंडिया’त झालेली निवड ऐतिहासिक ठरली. कारण केदार जाधवच्या रूपाने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचा पहिला क्रिकेटपटू विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला हे विशेष.
पूर्वी हिंदुस्थानी संघात मुंबई आणि महाराष्ट्राचे 7-8 क्रिकेटपटू असायचे, मात्र अलीकडे ‘टीम इंडिया’तील मराठी टक्का कमी होत गेला. विश्वचषक स्पर्धेत तर एक-दोन खेळाडूंची वर्णी लागणे मुश्कील झाले आहे. मागील विश्वचषक स्पर्धेत अजिंक्य रहाणे व रोहित शर्मा हे दोन महाराष्ट्रीयन खेळाडू हिंदुस्थानी संघात होते. मात्र रहाणेला यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतून वगळण्यात आले. पुण्याचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधवला या संघात संधी मिळाली. केदारला विश्वचषक स्पर्धेसाठी ‘टीम इंडिया’त संधी मिळाल्याने महाराष्ट्राच्या क्रिकेटसाठी हा अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण ठरला आहे.
विश्वचषक स्पर्धेत श्रीरामपूरचा (जि. नगर) झहीर खान दोन विश्वचषक स्पर्धांत खेळलेला आहे, मात्र हा महाराष्ट्रीयन खेळाडू आधी बडोदा संघाकडून व नंतर मुंबई संघाकडून खेळला. महाराष्ट्राचा असूनही झहीर खान कधी महाराष्ट्राकडून खेळला नाही हे आपले दुर्दैवच म्हणावे लागेल. त्यामुळे केदार जाधक या मराठी चेहऱ्याला विश्वचषक स्पर्धेसाठी हिंदुस्थानी संघात स्थान मिळणे ही मोठी बाब ठरली. केदारबरोबरच रोहित शर्मा हादेखील मुंबईकर ‘टीम इंडिया’चा उपकर्णधार असणार आहे. केदार जाधव कामचलाऊ गोलंदाज आणि मधल्या फळीतील फलंदाज अशी अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू आहे. केदारनेही विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळविण्यासाठी कंबर कसली होती.
























































