
साबुदाणा खिचडी आणि उपवास याचं एक घट्ट समीकरण आहे. पण अलीकडे आपण उपवास नसतानाही, साबुदाणा खिचडी खातो. काही घरांमध्ये उपवास नसतानाही साबुदाणा खिचडीवर ताव मारला जातो. साबुदाणा खिचडी करण्याचं एक कसब आहे, खिचडी मोकळी आणि फडफडीत होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवणे हे गरजेचे आहे. साबुदाण्याची खिचडी चिकट होते. त्यामुळे बरेचजण बनवण्यासाठी पुढे होत नाहीत. पण परफेक्ट खमंग आणि मोकळी साबुदाणा खिचडी करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स या लक्षात ठेवायला हव्यात.
साबुदाणा खिचडी म्हणजे नुसतं शेंगदाण्याच्या कुटाचा भडीमार नाही. तर साबुदाणा खिचडी ही परफेक्ट होण्यासाठी ती मऊ आणि फडफडीत होणंही गरजेचं आहे. प्रत्येक पदार्थ चविष्ट बनवण्यासाठी ज्याप्रमाणे काही महत्त्वाच्या टिप्स फॉलो कराव्या लागतात. त्याचप्रमाणे, साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी, आपल्याला साबुदाण्याच्या निवडीपासून ते भिजवून बनवण्यापर्यंतच्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. तरच ती खिचडी उत्तम बनेल.
साबुदाणा खिचडी बनविण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
साबुदाण्याची खिचडी नेहमी मध्यम आकाराचा साबुदाणा वापरून बनवावी.
साबुदाणा भिजवताना प्रथम तो पाण्याने सुमारे 5-6 वेळा पूर्णपणे धुवावा. त्यातून काही पांढरी पावडर निघेपर्यंत धुवावे लागेल. त्यानंतर बोटभर पाण्यात साबुदाणा भिजत घालावा.
साबुदाणा जास्तीत जास्त 4-5 तास पाण्यात भिजत ठेवा. जास्त वेळ भिजवल्यास अधिक मऊ होऊ शकतो.
साबुदाणा चांगला भिजल्यावर, तो भांड्यातून बाहेर काढा आणि एका मोठ्या प्लेटमध्ये ठेवा आणि हलके वाळवा. असे केल्याने त्याचा ओलावा निघून जातो.
साबुदाणा भिजवताना पाण्यात थोडासा लिंबाचा रस घातला तर, साबुदाणा वातड होत नाही.
साबुदाणा खिचडी बनवताना, साबुदाणा सर्वात शेवटी घालावा. साबुदाणा अधिक काळ ढवळू नये. साबुदाणा खिचडी झाकण ठेवून शिजवू नका, त्यामुळे खिचडी चिकट होण्याची शक्यता असते.