
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या अपघाती मृत्यूचे गूढ आता अधिकच गडद होऊ लागले असून या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. या घटनेनंतर गिड्डे यांचा मोबाईल फोन आणि महत्त्वाचा डेटा असलेला लॅपटॉप संशयास्पदरीत्या गायब झाला आहे. विशेष म्हणजे, अपघाताच्या दिवशी दिवसभर त्यांच्यासोबत सावलीसारखे वावरणारे चार ते पाच मित्र सध्या भूमिगत झाले असून त्यांनी बाळगलेल्या मौनामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर, राकेश गिड्डे यांच्या मृत्यूची सखोल आणि विधीपूर्ण कायदेशीर चौकशी व्हावी, अशी आक्रमक मागणी आता त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे.
राकेश गिड्डे यांच्या अकाली निधनामुळे त्यांचे कुटुंबीय धक्क्यात असले तरी, मृत्यूभोवती असलेल्या संशयास्पद बाबींमुळे नातेवाईकांमध्ये प्रचंड संताप आहे. हा केवळ एक अपघात आहे की घातपात, याचा छडा लागणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. अपघाताच्या वेळी नेमके काय घडले, याची पूर्ण कल्पना सोबत असलेल्या त्या मित्रांना असावी, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला असून पुराव्यांशी छेडछाड करण्यासाठीच मोबाईल आणि लॅपटॉप गायब करण्यात आला की काय, अशी शंका आता व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गिड्डे यांचे कुटुंबीय लवकरच प्रशासन आणि पोलिसांकडे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची अधिकृत मागणी करणार आहेत. सत्य समोर आल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. “ज्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत सोबत वेळ घालवला, त्यांनी स्वतःहून समोर येऊन पोलिसांना खरी माहिती द्यावी,” असे आवाहन पीडित कुटुंबाने केले आहे. सोबत असणारे मित्र अद्याप समोर का आले नाहीत आणि त्यांनी वस्तुस्थिती का लपवून ठेवली आहे, या प्रश्नांमुळे तपासाची सुई आता त्यांच्या दिशेने वळली आहे.




























































