केजरीवालांची ‘तिसरी कसम’, दिल्लीतील रामलीला मैदानात घेतली तिसर्‍यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ

392

दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसला धूळ चारल्यानंतर ‘आम आदमी पार्टी’चे नेते अरविंद केजरीवाल सलग तिसर्‍यांदा मुख्यमंत्री पदावर रविवारी विराजमान झाले. दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी रामलीला मैदानात पार पडलेल्या शानदार सोहळ्यात केजरीवाल यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तत्पूर्वी सकाळीच केजरीवाल यांनी ट्विटरवर दिल्लीकरांना सोहळ्याला उपस्थित राहून त्यांच्या सुपुत्राला आशीर्वाद देण्याचे आवाहन केले होते.

या शपथविधी सोहळ्यात केजरीवाल मंत्रिमंडळातील सहा मंत्र्यांनीही शपथ घेतली. केजरीवाल यांनी आपल्या आधीच्या मंत्रिमंडळातील सदस्यांनाच नव्या मंत्रिमंडळातही कॅबिनेट मंत्रीपदे दिली आहेत. यात मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय, कैलाश गेहलोत, इमरान हुसैन आणि राजेंद्र पाल यांचा समावेश आहे. रविवारी झालेल्या शपथविधी सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे केजरीवाल यांनी कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री वा दुसर्‍या पक्षाच्या नेत्यांना बोलावण्याऐवजी दिल्लीच्या निर्मितीसाठी खर्‍या अर्थाने उपयोगी पडलेले, पण वेगवेगळ्या स्तरातील 50 पाहुण्यांना आमंत्रित केले होते.

भाजपचे सातही आमदार गैरहजर

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी भाजपच्या विजयी ठरलेल्या सातही आमदारांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले होते. मात्र या आमदारांपैकी कुणीही सोहळ्याला उपस्थित राहिले नाही. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा रविवारी वाराणसीच्या दौर्‍यावर असल्यामुळे केजरीवालांच्या शपथविधी सोहळ्याला येऊ शकले नाहीत. आता सातही आमदार सोहळ्याला का हजर राहू शकले नाहीत याचे कारण मात्र लगेच स्पष्ट होऊ शकलेले नाही.

शपथविधीसाठी पोलिसांची फौज

दिल्लीतील रामलीला मैदानावर रविवारी पार पडलेल्या केजरीवाल मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला 2 ते 3 हजार पोलिसांच्या तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या होत्या. यात दिल्ली पोलीस, निमलष्करी दले आणि सीआरपीएफच्या जवानांचाही समावेश होता. या सोहळ्यासाठी रामलीला मैदानाजवळील रस्त्यांवरील वाहतूकही सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत दुसर्‍या रस्त्यांवर वळविण्यात आली होती.

पंतप्रधान मोदी अनुपस्थित

अरविंद केजरीवाल यांनी रविवारी दिल्लीच्या रामलीला मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आग्रहाचे निमंत्रण होते, मात्र ते या समारंभास उपस्थित नव्हते. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर जनतेला संबोधित करताना केजरीवाल म्हणाले की, पंतप्रधानांना शपथग्रहण सोहळ्याचं आमंत्रण दिले होते. मात्र वाराणसी येथे एका नियोजित कार्यक्रमामुळे त्यांना शपथविधीला उपस्थित राहता आले नाही, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

केंद्राच्या आशीर्वादाची गरज

शपथविधी सोहळ्यानंतर अफाट जनसमुदायासमोर भाषण करताना केजरीवाल म्हणाले की, दिल्लीत आता नव्या प्रकारचे राजकारण सुरू झाले आहे. दिल्ली मॉडेलकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत ज्यांनी आम्हाला नावं ठेवली, आमच्याबद्दल अनुद्गार काढले, त्यांना आम्ही माफ केले आहे. आता आम्हाला केंद्र सरकारसोबत मिळून जनतेसाठी काम करायचे आहे. दिल्लीच्या विकासासाठी आणि दिल्लीला पुढे नेण्यासाठी मला पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारच्या आशीर्वादाची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या