सरकारी मदत मिळायला झाला उशिर, पूरग्रस्त मजूराची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केरळमध्ये एका पूरग्रस्त मजूराला वेळेत शासकीय मदत न मिळाल्याने त्याने आत्महत्या केली आहे. 2019 च्या पुरात या मजूराचे घर वाहून गेले होते.

केरळच्या वायनाडजवळ सानल कुमार राहत होते. 2018 च्या पुरात त्यांच्या घराला थोडी हानी पोहोचली होती. परंतु 2019 च्या पुरात त्यांचे पूर्ण घर वाहून गेले. पुरानंतर राज्य सरकारने पुरग्रस्तांना मदत जाहीर केली होती. घराच्या बांधकामासाठी ही मदत मिळणार होती. परंतु अनेक महिने झाले तरी कुमार यांना ही मदत मिळत नव्हती. कुमार यांनी सरकारी अनास्थेला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे स्थानिक भागात संतापाची लाट उसळली.

आमदार सी.के ससीनद्रन यांनी ही घटना अतिशय दुःखदायक असल्याचे सांगितले. तसेच या प्रकरणी महसूल अधिकार्‍यांना नोटीसही बजावण्यात आली आहे. त्यानंतर अधिकार्‍यांनी पूरग्रस्त कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना चार लाख रुपयांची मदत सुपुर्द केली.