भाकप नेत्याच्या मुलावर मुंबईतील महिलेचा बलात्काराचा आरोप, गुन्हा दाखल

35

सामना ऑनलाईन । मुंबई

भाकपचे नेते कोडेयेरी बाळकृष्णन यांचा मुलगा बिनॉय कोडेयेरी यांच्यावर मुंबईमध्ये राहणाऱ्या 33 वर्षीय महिलेने बलात्कार व फसवणुकीचा आरोप केला आहे. बिनॉय कोडेयेरी हेच तिच्या 8 वर्षीय मुलाचे वडील आहेत असा आरोप या महिलेने केला आहे. याचे पुरावे देखील आपल्याकडे असल्याचा दावा महिलनेने केला आहे. तसेच डीएनए तपासणीसाठीही आपण तयार असल्याचे महिलेने म्हटले आहे. महिलेच्या तक्रारीवरून 13 जून रोजी मुंबईतील ओशिवरा पोलीस स्थानकात बिनॉय कोडेयेरी याच्याविरोधात कलम 420 आणि 376 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिनॉय कोडेयेरी याने लग्नाचे आमिष दाखवून आपल्यावर बलात्कार केल्याचा पीडित महिलेने आरोप केला आहे. पीडितेने ओशिवरा पोलीस स्थानकात बिनॉय कोडेयेरी यांच्याशी असलेले नाते सिध्द करण्यासाठी काही कागदपत्रं पुरावे म्हणून दिले होते. या कागदपत्रांमधील बँक स्टेटमेंटनुसार 2010 ते 2015 मध्ये बिनॉय कोडेयेरी यांच्या खात्यातून दर महिन्याला 80,000 ते 1 लाख रु. ट्रान्सफर झाल्याची नोंद आहे. तसेच पीडितेने पुरावा म्हणून सादर केलेल्या मुलाच्या जन्म दाखल्यावर व पासपोर्टवर वडिलांच्या जागी बिनॉयचे नाव दिसत आहे.

दरम्यान, या प्रकरणी ओशिवरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाल्यानंतर बिनॉय कोडेयेरी याने महिलेचे आरोप फेटाळून लावले आहे. तसेच पुरावे म्हणून सादर केलेले कागदपत्रं खोटी असल्याचा दावाही त्याने केला आहे. पैशांसाठी महिला आपल्याला ब्लॅकमेल करत असून 5 कोटी रुपये मागत असल्याचा उलट दावा बिनॉयने केला आहे. याबाबत महिलेच्या वकिलांनी मात्र मुलाच्या देखभालीसाठी पीडिता पैशांची मागणी करत असल्याचे सांगितले.

काय आहे नक्की प्रकरण?
पीडितेच्या आरोपानुसार, दुबईत डान्सरेच काम करताना तिची आणि बिनॉयची भेट झाली होती. बिनॉय या ठिकाणी नेहमी येत असत. यादरम्यान दोघांमध्ये जवळचे संबंध आले आणि बिनॉयने लग्नाचे आमिष दाखवून नोकरी सोडण्यास सांगितले. त्यानंतर 2010 मध्ये मुंबईमध्ये परतले आणि बिनॉयने भाड्याने घेऊन दिलेल्या फ्लॅटमध्ये राहू लागले. मुंबईत येण्यासाठी 18 ऑक्टोबर 2009 ला आम्ही लग्न केल्याचे पीडितेने सांगितले. तसेच बिनॉयकडून 22 जुलै, 2010 रोजी आपल्याला एक मुलगा झाल्याचा दावा पीडितेने केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या