केरळ उच्च न्यायालयाकडून ‘द केरळ स्टोरी २’ च्या प्रदर्शनाला स्थगिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केरळ स्टोरी २ चा टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा चित्रपट २७ फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु केरळ उच्च न्यायालयाने त्याच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली आहे. केरळ उच्च न्यायालयाने वादग्रस्त चित्रपट ‘केरळ स्टोरी २’ च्या प्रदर्शनावर १५ दिवसांची अंतरिम स्थगिती जारी केली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला चित्रपटाच्या सेन्सॉर प्रमाणपत्राला आव्हान देणारी याचिका दाखल झाल्यानंतर केरळ उच्च न्यायालयाने गुरुवारी ‘द केरळ स्टोरी २’ च्या प्रदर्शनाला स्थगिती दिली.

सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती बेचू कुरियन थॉमस यांनी निर्देश दिले की, हा चित्रपट २७ फेब्रुवारीला प्रदर्शित करता येणार नाही. कामाख्या नारायण सिंह दिग्दर्शित आणि विपुल अमृतलाल शाह निर्मित, ‘द केरळ स्टोरी २’ मध्ये असा दावा करण्यात आला आहे की, तरुण हिंदू महिलांना आंतरधर्मीय विवाह करण्यास प्रवृत्त केले जाते. त्यानंतर त्यांच्यावर हल्ला केला जातो. त्यांचे हक्क हिरावून घेतले जातात आणि इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले जाते. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चित्रपटाचा आशय वादात सापडला आहे.

बुधवारी सुनावणीदरम्यान न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये केरळचे अत्यंत नकारात्मक चित्रण केले आहे आणि त्याचे व्यापक सामाजिक परिणाम होऊ शकतात असा आरोप केल्यानंतर हे प्रकरण हाती घेण्यात आले. याचिकेवर कारवाई करताना, केरळ उच्च न्यायालयाने माहिती आणि प्रसारण मंत्रालय, केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ आणि चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटीस बजावली आहे.