केरळमध्ये भाजपसंबंधित महिलेने मतदाराला पैसे वाटले ? पोलिसांकडून गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
500-rupee-note

केरळमधील पालक्काड मतदारसंघात मतदानाच्या आधी मतदारांना लाच दिल्याच्या आरोपावरून भाजप-नेतृत्वाखालील एनडीए आघाडीच्या प्रतिनिधींविरोधात बुधवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे.

एफआयआरनुसार, 8 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 10 वाजता एनडीएशी संबंधित काही प्रतिनिधींनी पालक्काड परिसरात घराघरांत जाऊन मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप आहे. 2026 च्या विधानसभा निवडणुकीत मतांवर प्रभाव टाकण्यासाठी हा प्रकार केल्याचे नमूद करण्यात आले आहे. ही तक्रार भारतीय न्याय संहिता तसेच लोकप्रतिनिधित्व कायद्यांतर्गत दाखल करण्यात आली असून, निवडणूक नियमांचे उल्लंघन आणि मतदारांना लाच देण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी रथन यू. केळकर यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, काही मल्याळम वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झालेल्या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने तत्काळ फ्लाइंग स्क्वॉड घटनास्थळी पाठवले. या व्हिडिओमध्ये भाजप उमेदवार शोभा सुरेंद्रन यांच्याशी संबंधित असल्याचा आरोप असलेली एक महिला एका वृद्ध मतदाराला पैसे देताना दिसत असल्याचे सांगितले जाते.

या प्रकरणात ६५ वर्षीय देवू या महिलेचा जबाब नोंदवण्यात आला. मात्र, संबंधित महिलेने आपल्याला कोणतेही पैसे मिळाले नसल्याचे स्पष्टपणे नाकारले आहे. तरीही आरोपांची गंभीरता लक्षात घेता जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सखोल चौकशीची शिफारस केली आहे.

निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, या चौकशीत लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 आणि आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे का, याचा तपास केला जाणार आहे. जिल्हाधिकारी एम. एस. माधवीकुट्टी यांनी या संदर्भातील प्राथमिक अहवाल जिल्हा पोलीस प्रमुखांकडे सुपूर्द केला आहे.

दरम्यान, भाजप उमेदवार शोभा सुरेंद्रन यांनी हे सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगत फेटाळले आहेत. “काँग्रेस कार्यकर्ते काही दिवसांपासून माझ्या मागावर असून, पूर्वनियोजित पद्धतीने मला लक्ष्य करत आहेत. एका कार्यकर्त्याने माझ्याविरुद्ध अश्लील इशाराही केला,” असा आरोप त्यांनी केला.

दुसरीकडे, स्थानिक काँग्रेस युनिटने संबंधित महिलेचे फोटो प्रसिद्ध करत ती भाजपच्या प्रचारसभांमध्ये उपस्थित असल्याचा दावा केला आहे. सत्य दडपण्यासाठी सुरेंद्रन खोटे आरोप करत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला.

पालक्काड मतदारसंघात यंदा भाजपच्या शोभा सुरेंद्रन, काँग्रेसचे रमेश पिशारोडी आणि सीपीआय(एम) समर्थित अपक्ष उमेदवार एन. एम. आर. रझाक यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. मागील तीन निवडणुकांमध्ये भाजप उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले असून, काँग्रेसने आघाडी घेतली होती. या पार्श्वभूमीवर लाचलुचपत प्रकरणामुळे निवडणुकीत आणखी रंग चढण्याची शक्यता आहे.