
साकीनाक्याजवळच्या आशापुरा कंपाऊंडमध्ये रासायनिक गाळे आणि गोदामांना लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर पालिकेने खैरानी रोडवरील नियम धाब्यावर बसवणाऱया गाळे, गोदामे तसेच हॉटेल्सवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. उद्यापासून पालिका कारवाईचा धडाका सुरू करणार आहे. त्यामुळे येथील हॉटेल्स, गोदामे, गाळेधारकांचे धाबे दणाणले आहेत.
साकीनाका येथील खैरानी रोडवरील औद्योगिक गाळ्यांना शुक्रवारी लागलेल्या आगीच्या दुघर्टनेत दोघांचा मृत्यू झाला तर एकजण अजूनही बेपत्ता आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पालिका या भागातील नियम धाब्यावर बसवणाऱया गाळे, गोदामे, दुकाने तसेच हॉटेल्सवर कारवाई करणार आहे. पालिकेच्या विशेष पथकाकडून ही कारवाई केली जाणार आहे.
चार-पाच वर्षांपूर्वी कुर्ल्यातील ‘सिटी किनारा’ हॉटेल्समधील आगीच्या दुघर्टनेनंतर पालिकेने मुंबईतील सर्व ढाबे, हॉटेल्स, पबवर कारवाईचा बडगा उगारला होता. यात अनेक बडय़ा हॉटेल्सवर पालिकेने कारवाई केली. अनेक व्यावसायिकांचे नियम धाब्यावर बसवून व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले. पुढे ही कारवाई थंडावल्याने या भागात अनधिकृतपणे व्यावसायिकांनी बस्तान मांडले आहे. या पार्श्वभूमीवर पालिका या भागात शोधमोहीम हाती घेऊन कारवाई करणार आहे.
कठोर कारवाई होणार
‘एल’ विभागात अग्निशमन दलाच्या कक्षामार्फत वर्षभर गाळ्यांची तपासणी केली जाते, मात्र या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई कठोर करावी लागणार आहे. अग्निशमन दल, जलअभियंता विभाग, परवाना विभाग, आरोग्य विभाग, पोलीस तसेच इमारत आणि कारखाना विभागाच्या माध्यमातून संयुक्तपणे कुर्ला-साकीनाका रोड, खैरानी रोड, जरीमरी रोड इत्यादी रोडवरील गाळ्यांसह हॉटेल्सविरोधात पुन्हा संयुक्त मोहीम हाती घेतली जाणार असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱयांनी दिली.
आयुक्तांसोबत आज बैठक
साकीनाक्याच्या आग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱयांची उद्या आयुक्तांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कारवाईबाबतचा आढावा घेतला जाणार आहे. आगीतील मृतांच्या नातेवाईकांना मदत देण्याबाबतचा निर्णय या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे.




























































