खालापूर पोलिसांनी पुढाकार घेऊन खड्डेमय रस्ता केला सुस्थितीत

357

मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई पुणे महामार्ग, पेण खोपोली राज्यमार्ग त्याचबरोबर जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे रस्ते खड्डेमय झाले असल्याने याचा त्रास प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भोगावा लागत आहे. खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण ही वाढत चालले आहे. पेण खोपोली खालापूरकडे येणाऱ्या रस्त्यावर इंडिया बुल प्रकल्पासमोरील रस्त्यालाही मोठमोठे खड्डे पडले असल्याने खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक काईगुडे यांनी पुढाकार घेऊन सहकार्याच्या मदतीने खड्डे भरले. खड्डे भरण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असतानाही हा विभाग निष्क्रिय झाला आहे. मात्र पोलिसांनी सामाजिक बांधिलकीचे भान राखून खड्डे भरले असून वर्दीतील माणुसकी समोर आली आहे. पोलिसांनी खड्डे भरल्यानंतर बांधकाम विभागाला जाग आल्यानंतर खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे.

महामार्ग, राज्यमार्ग, अंतर्गत रस्ते यावर कुठे अपघात झाला की, आधी पोलिसांना पाचारण केली जाते. पोलीस अपघातग्रस्त ठिकाणी पोहोचून आपली जबाबदारी पार पाडत असतात. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे प्रवाशांचा जीव जात आहे तर काहीजण जखमी होत आहेत. हा उद्देश ओळखून खड्डेमय रस्त्यामुळे कोणाचा बळी जाऊ नये वा कोणी जखमी होऊ नये यासाठी खालापूर पोलिसांनी गांधीमार्ग अवलंबून पडलेले खड्डे बुजविण्यास सुरुवात केली.

पेणकडून खालापूरकडे जाणाऱ्या इंडिया बुल प्रकल्पासमोरील रस्त्याला मोठं मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे याठिकाणी अपघाताची शक्यता होती. खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक काईगुडे यांनी पुढाकार घेऊन खड्डे भरण्याचे ठरवले. यासाठी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या संघटनेनेही पोलिसांना मदतीचा हात पुढे केला. रात्रीच्या काळोखात 14 सप्टेंबर रोजी पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांनी खड्डे भरण्यास सुरुवात केली. 10 सप्टेंबर पासून या रस्त्याचे नव्याने काम घेतलेली रोडवेज कंपनी खड्डे बुजविण्याच्या बाबतीत चालढकलपणा करत आहे. त्यात अनेक गाड्यांचे कंबरडेच मोडल्याचे पोलीसांनी पाहीले. खरं तर पनवेल पर्यंत हीच परिस्थिती रस्त्यांची झाली आहे.

एक्सप्रेस वेवर तर जागोजागी खड्डे पडलेत. याबाबतीत एमएसआरडीसी बोटचेपी भूमिका घेत आहे. या सर्व कुंभकर्णीय परीस्थितीत रस्त्यावर पोलीस यंत्रणा कामाला उतरली असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी यंत्रणेने यातून धडा घेऊन पडलेले खड्डे बुजविण्यासाठी आता तरी पावले उचलावी अशी मागणी प्रवाशांकडून होत होती. खालापूर पोलिसांनी उचललेल्या या पावलाने बांधकाम विभागाला जाग आल्यानंतर खालापूर रस्त्यावर खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पोलिसांच्या या भूमिकेमुळे बांधकाम विभाग खडबडून जागे झाले हे महत्त्वाचे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या