खालापूरकरांची घरपट्टी दुपटीने वाढवली, कोणताही सर्व्हे न करता घेतला निर्णय

कोणतेही सर्वेक्षण न करता खालापूर नगरपंचायतीने घरपट्टीमध्ये दुपटीने तिपटीने वाढ केली आहे. त्यामुळे ज्या घरांसाठी पूर्वी 500 रुपये घरपट्टी आकारली जात होती, त्याच घरांसाठी आता एक ते दीड हजार रुपये घरमालकांना घरपट्टीपोटी मोजावे लागणार आहेत. नगरपंचायतीच्या या मनमानी निर्णयाला रहिवाशांनी कडाडून विरोध केला असून ही मनमानी हाणून पाडण्यासाठी येत्या गुरुवारी नगरपंचायतीवर धडक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

खालापूर नगरपंचायत प्रशासनाने घरपट्टीमध्ये वाढ करण्याची नोटीस काढल्यानंतर शहरात संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी आज शहरातील रुद्र हनुमान मंदिरामध्ये सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते. घरपट्टीमध्ये वाढ करताना नगरपंचायत प्रशासनाने नागरिकांना विश्वासात घेणे आवश्यक होते. मात्र तसे काहीएक न करता प्रशासनाने थेट घरपट्टीमध्ये वाढ करण्याची नोटीस काढली. या कार्यपद्धतीवर नागरिकांनी नाराजी व्यक्त करून या वाढीव घरपट्टीला कडाडून विरोध केला. नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात सभेत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

घरपट्टी वाढीबाबत आक्षेप नोंदवण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर असल्यामुळे नागरिक आता सामूहिकरीत्या लेखी आक्षेप सादर करणार आहेत. येत्या 6 नोव्हेंबर रोजी गुरुवारी नगरपंचायत मुख्यालयावर धडक देऊन मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा निर्णय या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

एका नागरिकाला यापूर्वी वार्षिक घरपट्टी 506 रुपये इतकी येत होती. आता प्रशासनाने 27 हजार 216 रुपयांची घरपट्टी पाठवली आहे. ही रक्कम एकाच वर्षाची आहे की चार वर्षांची, हे स्पष्टपणे नमूद केलेले नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

खालापूरमधील सर्व नागरिकांनी यापूर्वीच या वाढीव घरप ट्टीबाबत आक्षेप नोंदवले आहेत. तरीदेखील नगरपंचायत प्रशासन मनमानी पद्धतीने घरपट्टीमध्ये वाढ केली आहे. नागरिकांचे अक्षेप गांभीर्याने घेतलेले नाहीत.

दगड-विटांचे घर आरसीसी दाखवले

घरपट्टी वाढवण्याचा निर्णय घेण्यापूर्वी प्रशासनाने शहरातील सर्व माल मत्तांचा सर्व्हे करणे आवश्यक होते. मात्र तसे काहीच करण्यात आलेले नाही. घरपट्टी वाढवण्यासाठी दगड आणि विटांमध्ये बांधलेल्या घराचे बांधकाम आरसीसी दाखवण्यात आले आहे, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक अवधूत भुर्के यांनी करून नगरपंचायतीच्या या मनमानी कारभाराला कडाडून विरोध केला आहे.