जान्हवी कुकरेजावर लैंगिक अत्याचार नाही, फॉरेन्सिक अहवालातून उघड झाली बाब

प्रातिनिधिक फोटो

जान्हवी कुकरेजा हत्येप्रकरणाबाबत फॉरेन्सिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे.  अहवालामध्ये तिच्यावर कुठल्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झालेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र तिच्या शरीरावर तब्बल 48 जखमा झाल्या असल्याचं या अहवालात म्हटलंय. जान्हवीच्या डोक्याला भयंकर मार लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र आरोपींनी ही हत्या का केली? त्यांचा उद्देश काय होता? याबाबत मात्र अजून पुरेशी माहिती मिळू शकलेली नाहीये.

मुंबईच्या खार परिसरात नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जान्हवीची हत्या करण्यात आली होती. जान्हवी मानसशास्त्राची विद्यार्थिनी होती आणि ती खारच्या भगवती हाईट्स टॉवरच्या सोळाव्या मजल्यावर आयोजित केलेल्या पार्टीत सामील झाली होती.  त्या पार्टीत जान्हवीची मैत्रीण दिया पडळकर श्री जोगधनकर हे देखील होते. जान्हवीने या पार्टीदरम्यान श्री आणि दियाला आक्षेपार्ह स्थितीत पाहिले होते. दिया तिची चांगली मैत्रीण असल्याने जान्हवीला तिला या स्थितीत पाहावलं नव्हतं. तिने दियाशी वाद घातला आणि ती पार्टीतून निघून जात होती. यावेळी दिया आणि श्री या दोघांनी तिचा पाठलाग केला आणि समजावण्याचा प्रयत्न केला. संतापलेली जान्हवी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. इमारतीच्या पायऱ्यांवर जान्हवीची दिया आणि श्रीसोबत वादावादी सुरू झाली होती. या वादावादीदरम्यान दिया आणि श्रीने जान्हवीला ढकलून दिलं असावं ज्यामुळे तिचा मृत्यू झाला असा पोलिसांना अंदाज आहे.

रविवारी फॉरेन्सिक विभागाच्या तज्ज्ञांनी जान्हवीची हत्या कशी झाली असेल ते जाणून घेण्यासाठी त्याच ठिकाणी गुन्ह्याची घटना नाट्यरुपांतराच्या माध्यमातून जिवंत करण्याचा प्रयत्न केला. या प्रक्रियेमध्ये तज्ज्ञांना काही त्रुटी असून हत्येचा उद्देश अजून स्पष्ट होत नसल्याचं दिसून आलं आहे. हे तज्ज्ञ आता डीएनए टेस्ट करुन तिथे सापडलेले काही पुरावे त्यांच्याशी जुळतायत का हे तपासणार आहेत.

1 जानेवारीच्या मध्यरात्री 2.30 वाजता आरोपी श्री ने लिंकिंग रोडवरुन टॅक्सी पकडली होती. ही टॅक्सी  4 लेनपासून 1.6 किमी अंतरावर होती. जिथे पार्टी आयोजित केली होती. तिथून तो वडाळ्याच्या जीटीबी नगरात गेला त्यानंतर तो सायन रुग्णालयात गेला असं पोलिसांनी म्हटलं आहे. ज्या दिवशी जान्हवीची हत्या करण्यात आली, त्याच रात्री श्री हा जखमी झाला होता. त्याला जखमा कशा झाल्या याबाबत दोघांना प्रश्न विचारला असता दिया आणि श्री या दोघांनीही समाधानकारक उत्तरे दिलेली नाहीत. यामुळे अधिक माहिती जमा करण्यासाठी पोलीस आता श्रीला ज्या टॅक्सीवाल्याने सायन रुग्णालयात नेलं होतं, त्याचा शोध घेत आहेत. आरोपी श्री ने रुग्णालयात उपचारासाठी गेल्यावर डॉक्टरांना अपघात झाल्याचे कारण सांगितले होते त्यामुळे या डॉक्टरांचाही जबाब नोंदवून घेण्यात येणार आहे. 

जान्हवी कुकरेजाच्या कुटुंबीयांची बाजू त्रिवनकुमार करनानी आणि गायत्री गोखले हे न्यायालयात मांडत आहे. या दोघांनी आरोपींच्या कोठडीत वाढ करावी अशी मागणी केली होती. हत्येचा उद्देश अजून स्पष्ट झाला नसल्याने पोलिसांना चौकशीची अधिक संधी द्यावी ज्यासाठी कोठजी गरजेची आहे असं या दोघांनी त्यांच्या युक्तिवादात म्हटले होते. फॉरेन्सिक अहवालात जान्हवीच्या शरीरावर जखमा दिसून आल्याने त्या कशा झाल्या याचाही शोध लावण्याची गरज असल्याचे वकील त्रिवनकुमार करनानी यांनी म्हटले आहे. श्री जोगधनकर याच्यावतीने  गणेश गुप्ता हे न्यायालयात वकिली करत असून त्यांनी कोठडीत वाढ करण्याची गरज नसल्याचं युक्तिवादात म्हटले होते. मात्र न्यायालयाने या दोघांची कोठडी 14 जानेवारीपर्यंत वाढवण्याचे आदेश दिले. या प्रकरणात जान्हवीची लहान बहीण निधीने आपल्या बहिणीसाठी सह्यांची ऑनलाईन मोहीम (#justiceForJhanvi) सुरु केली आहे. या मोहिमेला आतापर्यंत 14,750 लोकांनी प्रतिसाद दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या