खारमध्ये दहाव्या मजल्यावरून उडी मारून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खार येथे राहणाऱया अल्पवयीन मुलीने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घडल्या प्रकरणी खार पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून त्या मुलीच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आत्महत्येपूर्वी तिने तिच्या एका मैत्रिणीला मेसेज पाठवला होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे.

अल्पवयीन मुलगी ही खारच्या 16वा रोड परिसरात राहत होती. गेल्या आठवडय़ात ती कुटुंबीयांसोबत लोणावळा येथे गेली होती. मंगळवारी ती लोणावळ्यावरून घरी आली. ती कोणाशी काही न बोलता बेडरूममध्ये गेली. तिने आतून दरवाजा बंद करून दहाव्या मजल्यावरून खाली उडी मारली.

हा प्रकार इमारतीच्या सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आला. त्याने त्याची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना दिली. जखमी अवस्थेत मुलीला लीलावती रुग्णालयात दाखल केले. तेथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याची माहिती समजताच खार पोलीस घटनास्थळी गेले. खार पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून मुलीच्या कुटुंबीयांचा जबाब नोंदवून घेतला. तिने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.