
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवडय़ातील कामकाजाला उद्या सुरुवात होत आहे. नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत उमटण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेतला असला तरी विरोधी पक्षाकडून हे प्रकरण लावून धरले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित केला जाणार आहे.
गुढीपाडवा आणि रमजान ईद तसेच शनिवार, रविवार अशा सलग चार दिवसांच्या सुट्टीनंतर विधिमंडळाच्या अधिवेशनाला सोमवारी पुन्हा सुरुवात होत आहे. या आठवडय़ात अधिवेशनाचे कामकाज तीन दिवस म्हणजे 25 मार्चपर्यंत चालणार आहे. अधिवेशन शेवटच्या टप्प्यात असताना नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण उघडकीस आले. आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या अशोक खरातचा भंडापह्ड होताच पोलिसांनी त्याला बेडय़ा ठोकल्या. खरातशी जवळीक ठेवल्या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा घेतला आहे. याशिवाय खरात प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्यासाठी विशेष चौकशी पथक नेमण्यात आले आहे.
अशोक खरातसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची छायाचित्रे समाज माध्यमात व्हायरल झाली आहेत. शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांच्यावरही खरात प्रकरणावरून आरोप होत आहेत. याशिवाय मुंबईतील उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे-पाटील यांच्या पत्नीची अशोक खरातच्या पत्नीसोबतची भागीदारी उघड झाली आहे. सत्ताधारी पक्षाचे नेते आणि प्रशासनातील अधिकारी खरातच्या संपका&त असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाकडून उद्या स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून चर्चेची मागणी होण्याची शक्यता आहे. सरकारने ही चर्चा फेटाळली तर विरोधी पक्ष आणखी आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. विरोधी पक्षाचे संसदीय आयुध असलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चे वेळी विरोधक खरात प्रकरणावरून राज्य सरकारला लक्ष्य करण्याच्या तयारीत आहेत.
दरम्यान, गेल्या आठवडय़ात राज्याच्या काही भागाला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी विरोधी पक्षाकडून केली जाण्याची शक्यता आहे.
कुणालाही सोडणार नाही ः मुख्यमंत्री
भोंदू अशोक खरात प्रकरणातील कुणालाही सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून सर्वाधिक पुरावे आपल्याकडे आहेत. पीडित महिलांना धीर देऊन पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी एसआयटीकडून केली जात असून त्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना पोलीस महासंचालकांनाही देण्यात आल्या आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.




























































