खरात फाईल्समुळे फडणवीसांच्या मंत्रिमंडळातले अर्धे मंत्री तणावाखाली, संजय राऊत यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जर रुपाली चाकणकरांना हटवण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरले, तर ते राज्यासाठी दुर्दैवी ठरेल असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच खरात फाईल्समुळे फडणवीसांच्या मंत्रिमंडळातले अर्धे मंत्री तणावाखाली आहेत अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, एपिस्टन फाईलनंतर महाराष्ट्रात खरात फाईल समोर आली आहे. सगळ्यात आधी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अभिनंदन करतो की, या प्रकरणाची पाळंमुळं उखडून काढण्यासाठी त्यांनी जी मोहीम गृहखात्याच्या माध्यमातून राबवली. या महाराष्ट्राला कलंकित करणारी, बदनाम करणारी अशा प्रकारचे कृत्य त्याचे सूत्रधार आणि त्यांना राजकीय सामाजिक प्रतिष्ठा देणारे पुढारी मंत्री या सगळ्यांचे धाबे मुख्यमंत्र्यांच्या कारवाईमुळे दणालेले दिसतायत, असे त्यांनी सांगितले.

संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन मी यासाठी करतो की आम्ही त्यांच्यावर नेहमी टीका करतो, या प्रकरणात आम्ही कालही त्यांच्यावर नक्कीच टीका केलेली आहे. पण जस जशी माहिती समोर येते ती पाहता गेल्या 15 दिवसांपासून अत्यंत गुप्तपणे मुख्यमंत्र्यांनी या खरात फाईल संदर्भात कारवाईचे आदेश दिले होते आणि त्यानुसार पोलिसांची पथक काम करत होती आणि ते ऑपरेशन यशस्वी झालेलं आहे.

संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राला सामाजिक चळवळीची, पुरोगामी विचारांची आणि अंधश्रद्धेविरुद्ध लढण्याची एक फार मोठी परंपरा आहे. या परंपरेला गेल्या काही काळापासून डाग लावण्याचं काम मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळातले सहकारी करताना दिसतायत. आणि ते अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबतची साफ सफाई जर सुरू केली असेल तर ते कौतुकास पात्र आहेत, असे त्यांनी सांगितले.

संजय राऊत म्हणाले की, माझ्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीसजी यांच्या कॅबिनेटमधील अनेक मंत्र्यांचे गुरु महाराज आहेत. जे आता पोलीस कस्टडीमध्ये आहेत, त्यांची चौकशी सुरू आहे. ज्यांच्या मोबाईलमध्ये 56 नाही तर 56 पेक्षा जास्त आक्षेपार्ह क्लिप सापडल्या आहेत. त्याच्यामुळे फडणवीसांच्या सरकार मधले अर्धे मंत्री तणावाखाली आहेत. ते इतके तणावाखाली आहेत की काही लोकांना आयसीयूमध्ये भरती करावं लागेल.

संजय राऊत म्हणाले की, त्यानुसार या भोंदू बाबाने जी माहिती पोलिसांना दिली ती अत्यंत गोपनीय जरी असली तरी महाराष्ट्राच्या सध्याच्या मंत्रिमंडळातले नऊ मंत्री हे या भोंदू बाबाचे नियमित भक्त होते आणि त्यांच्याकडे जाऊन रेग्युलर काही अत्यंत घृणास्पद प्रकारचे विधी करत होते. अंधश्रद्धा आहे, त्याहीपेक्षा महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक करणारे हे प्रकरण आहे, असे त्यांनी सांगितले.

संजय राऊत म्हणाले की, या भक्तांमध्ये भारतीय जनता पक्षाचा अजून तरी कोणी दिसलेलं नाहीये. हे सरकार आणण्यासाठी, शिवसेना फोडण्यासाठी असं म्हटलं जातं की अंधश्रद्धेतले असे असंख्य अघोरी विधी करण्यात आले. महाराष्ट्राला त्या संदर्भात अनेक बातम्या वाचायला मिळाल्या, ऐकायला मिळाल्या. पण जेव्हा अशा प्रकारचे विधी केले जातात तेव्हा ते स्वतःपेक्षा दुसऱ्याचं नुकसान व्हावं अशी करणाऱ्याची भावना असते. आम्ही स्वतः ठाकरे कुटुंब आणि शिवसेना प्रबोधनकार ठाकरे, संत गाडगे, महात्मा फुले आणि आंबेडकरांच्या विचारांचे आहोत. आम्ही अशा गोष्टींवरती खतपाणी घातलं जाईल अशा प्रकारचं कोणतंही कृत्य आम्ही करत नाही.

संजय राऊत म्हणाले की, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जी कठोर पावलं या संदर्भात उचललेली आहेत त्याचं आम्ही पुन्हा पुन्हा अभिनंदन करत आहोत. एकटाच खरातच नाही तर, गेल्या पाच वर्षांमध्ये ठीक ठिकाणी असे अनेक खरात उभे करण्यात आले त्यांचा वापर केला जातो, असे त्यांनी नमूद केले.

संजय राऊत म्हणाले की, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकार यांना राजीनामा द्यावाच लागेल. जर सरकार एखाद्या व्यक्तीला संविधानिक पदावर नेमा अशी शिफारस करत असेल तर या व्यक्तीला त्या पदावरून काढा अशा प्रकारची शिफारस सुद्धा सरकार राज्यपालांना करू शकते. जेव्हा हे सगळे लोक त्यांना भेटले असतील तेव्हा हे कारनामे उघड झाले, पण जे लोक प्रत्यक्ष इथे विधीला बसलेले आहेत विधी करत आहेत, त्यांचा पायाचे तीर्थप्राशन करतायत ते अधिक मोठे गुन्हेगार आहेत, असे त्यांनी सांगितले.

संजय राऊत म्हणाले की, आम्ही स्वतः प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार आहोत. कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा आम्ही पाळत नाही, मान्य करत नाही. आपल्या राज्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू झालेला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याने या सगळ्या प्रकरणातल्या आरोपींवर आणि आरोपींना मदत करणाऱ्या व्यक्तींवरती कारवाई व्हावी अशी आमची भूमिका आहे, असे त्यांनी नमूद केले.

संजय राऊत म्हणाले की, मला मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धती विषयी कल्पना आहे ते गाफिल ठेवून मारतात. चाकणकरांचा राजीनामा हा महाराष्ट्राच्या सामाजिक प्रतिष्ठेसाठी घ्यावाच लागेल आणि तो सुनेत्रा ताई पवारांच्या माध्यमातूनच घेतला जाईल हे पण तुम्हाला मी सांगतो, असे त्यांनी सांगितले.

संजय राऊत म्हणाले की, खरातच्या संपत्तीची स्वतंत्र चौकशी होणं गरजेच आहे, की या प्रॉपर्टी मध्ये महाराष्ट्रातल्या किती मंत्र्यांचा सहभाग आहे त्यांची प्रॉपर्टी वाढवण्यात. महाराष्ट्रातल्या किती मंत्र्यांचा आजच्या सहभाग आहे ही संपत्ती 500 कोटी 600 कोटी हजार कोटी. या प्रकरणी सगळ्यांची नावं ही जाहीर व्हायला पाहिजेत तरच महाराष्ट्रातल्या जनतेला याच्यापासून एक धडा घेता येईल. राजकारणांना ज्यांची ज्यांची नाव समोर येत आहेत त्या प्रत्येकाचं नाव पोलिसांकडून समोर आलं पाहिजे कोणतंही नाव लपवता कामा नाये. माझ्याकडे सगळी नावं आहेत नाहीतर मी जाहीर करेन, असा इशारा त्यांनी दिला.

संजय राऊत म्हणाले की, हा विषय फक्त महिला आयोगाच्या अध्यक्षा मर्यादित नाहीये या प्रकरणामध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळातले काही मंत्री आहेत महत्त्वाचे नेते आहेत. यांचा सुद्धा विचार केला पाहिजे तुम्ही फक्त एक टार्गेट घेऊन जाऊ नका की महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत छत्रधारी पण काही प्रमुख मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेट मधले काही प्रमुख मंत्री तिथे सातत्याने जाऊन विधी करतात, असे त्यांनी नमूद केले.

संजय राऊत म्हणाले की, त्या विधी कोणासाठी काय महाराष्ट्राच्या हितासाठी तर नक्कीच नाही. पाऊस पडावा, चांगले शेत पिकावं, लोकांना रोजगार मिळावा यासाठी तहे विधी होत नाहीत. त्या विधीमुळे काहीच होत नाही. पण जर तसे असतील तर ती अत्यंत गंभीर गोष्ट आहे, असे त्यांनी सांगितले.

संजय राऊत म्हणाले की, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना जावंच लागेल. त्यांना घालवण्यात मुख्यमंत्री कमी पडणार नाहीत याची मला खात्री आहे. पण ते जरी कमी पडले तर ते राज्याच दुर्दैवं म्हणावं लागेल, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.