पोटाला पीळ पाडून हिरितलं पानी काढतुय.. टँकर बी पुरंना सायब.. विहिरी आटल्याने पाण्यासाठी खड्ड्यांचा शोध सुरू

नरेश जाधव, खर्डी
हिरी (विहिरी) खोल गेल्या.. पार कातळापावतुर.. पोटाला पीळ पाडून आमी हिरितलं पानी काढतुया.. जेमतेम एक घोट पानी लामण्यात (पोहऱ्यात) येतं. धरनाचं पानी समोर दिसतुय, पन आम्हास्नी त्याचा काय उपेग.. आता बोरवेल (बोअरवेल) चे खड्डे सोधतोय.. दोन दिवसाआड एक टँकर येतु.. पन टँकरचं पानी वी पुरनां सायब.. आम्ही जगायचं कसं सांगा.. हा आर्त टाहो आहे मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शहापूर तालुक्याच्या आदिवासी पाड्यातील माता-भगिनींचा. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा, वैतरणा, भातसा, मध्य वैतरणा या जलाशयांच्या कुशीतील गावपाडे मात्र तहानलेले आहेत. या गावपाड्यातील महिलांना घोटभर पाण्यासाठी रणरणत्या उन्हात अनेक किलोमीटरचे रस्ते तुडवावे लागत आहेत.

गावागावांना पाणी मिळावे यासाठी सरकारने जलस्वराज्य भारत निर्माण आणि राष्ट्रीय पेय जल यासारख्या 200 योजना जाहीर केल्या. मात्र त्या फक्त कागदोपत्रीच पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे या योजनांमधून थेंबभर पाणीही शहापूर तालुक्यातील सावरोली, अल्याणी, सोगाव, कळमगाव, फुगाळी, आघनवाडी, सावरदेव मानेखिंड, शिळ, मोहिली, दहिवली, भागदळ, वेहलोंढे, वद्रि, पाषाणे, वेळुख, भोसपाडा, डेंगणमाळ, दापूरमाळ, विहिगाव, तेलपाडा, दहिगाव, अजनूप या दुर्गम भागात आलेले नाही. जलजीवन मिशन या पाणी योजनेची कामे सुरू झाली, पण काही कामे निधीअभावी बंद पडली तर काही कामे वनपरवानग्यांमध्ये अडकून पडली. त्यामुळे ही पाणी योजनाही फोल ठरली. केंद्र आणि राज्य सरकारने मात्र या योजनांच्या नावाने करोडो रुपये खर्च करून स्वतःच्या जाहिराती केल्या, पण शहापूर तालुक्यातील आदिवासींची मात्र घोटभर पाण्यासाठी फरफट सुरूच आहे.

80 रुपये मोजून पाणी विकत घेण्याची वेळ
रोजगार हमी योजनेचे बारा वाजल्याने हाताला काम नाही. पाण्याच्या शोधासाठी बाहेर पडावे लागत असल्याने रोजची मजुरी बुडते, पण पाणीच मिळाले नाही तर रोज 80 रुपये मोजून एक छोटा बॅरल पाणी विकत घ्यावे लागते. पाण्यासाठी 80 रुपये खर्च केले तर घरात शिजवायचे काय? असा मोठा प्रश्न या आदिवासींसमोर उभा ठाकला आहे.

सरकारचे मंत्री इथे फिरकतात का?
व्यथा डोळ्यात पाणी आणून सांगितली. पाणी प्यायलो नाही तर आम्ही जगणार कसे? सरकारला आमची पर्वा कुठे आहे, असा सवाल त्यांनी केला. लाखो, करोडो रुपयांच्या योजना आणल्याची घोषणा सरकार करते, पण या योजना पूर्ण होतात का? त्याचे पाणी आमच्यापर्यंत पोहोचते का? हे बघायला एक तरी मंत्री इथे फिरकलाय का? असा संताप अजनूप गावातील संगिता आगिवले यांनी व्यक्त केला आहे. मुला-बाळांना घेऊन आम्हाला पाणी शोधण्यासाठी पायपीट करावी लागते. आम्हाला हक्काचे पाणी कधी मिळणार, असा सवाल विहिगाव येथील सावित्री उघडे यांनी केला.

शहापूर तालुक्यातील 32 गावे आणि 126 पाडे असे मिळून 158 गावांना अवघ्या 44 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र हा पुरवठा अत्यंत तुटपुंजा आहे. त्यातच सावरोली, अल्याणी, सोगाव, कळम गाव या गावांचीही पुरेशा पाण्याअभावी होरपळ सुरू आहे. त्यामुळे या गावातून टँकरची मागणी आली असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ लिपीक किशोर गायकवाड यांनी दिली.