ऑलिम्पिकनंतर झळकणार खाशाबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विठ्ठल देवकाते

खाशाबा जाधव नावाच्या महाराष्ट्राच्या सुपुत्राने 1952च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडविला. या मराठमोळय़ा कुस्तीपटूने हिंदुस्थानला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक (कांस्य) जिंकून देण्याचा भीमपराक्रम केलाय. अलीकडच्या काळात अनेक खेळ किंवा खेळाडूंवर चित्रपट आले; पण दुर्दैवाने देशाला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिकपदक जिंकून देणारे खाशाबा जाधव काहीसे दुर्लक्षित राहिले. मात्र आता मराठी चित्रपटसृष्टीत लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले नागराज मंजुळे यांनी खाशाबांवर चित्रपट तयार करण्यासाठी शड्डू ठोकलाय. पॅरिस ऑलिम्पिकनंतर (2024) खाशाबांचा बायोपिक पडद्यावर झळकणार असल्याची माहिती नागराज मंजुळे यांनी दै. ‘सामना’शी बोलताना दिली.

खाशाबा जाधव यांच्या बायोपिकने झपाटलेले नागराज मंजुळे सध्या फक्त खाशाबामय आणि कुस्तीमय झालेले आहेत. त्यामुळे या चित्रपटाविषयी त्यांनी दिलखुलासपणे संवाद साधला. ‘जिओ स्टुडिओज् आणि आटपाटनिर्मित’ खाशाबा जाधव यांच्या बायोपिकसाठी मी आता सर्वस्व पणाला लावलंय. ज्याला मराठी समजत नाही त्यालाही हा खाशाबांचा चित्रपट समजेल. अशा ताकदीचा सिनेमा मला बनवायचाय. माझी पटकथा तयार आहे. ही पटकथा लिहीत असताना खाशाबांसारख्या महान खेळाडूवर तर कधीच चित्रपट व्हायला हवा होता, याची मला प्रकर्षाने जाणीव झाली. माझे वडील आणि भाऊ भारत हे चांगले कुस्तीपटू होते. त्यामुळे लहानपणापासूनच या मर्दानी खेळाशी तशी माझी नाळ जोडली गेलेली आहे. अखेरच्या श्वासापर्यंत कुस्ती जगलेला… तांबडया मातीत घाम गाळलेला…अन् हिंदुस्थानच्या वैभवशाली कुस्ती परंपरेला ऑलिम्पिकच्या नकाशावर गौरव मिळवून देणाऱ्या खऱ्या मराठमोळय़ा हीरोची गोष्ट चित्रपटाच्या माध्यमातून जगापुढे मांडण्याची संधी मला मिळाली आहे. हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन तर करणारच आहे; मात्र प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ऑलिम्पिकमध्ये देशाचा तिरंगा आकाशात फडकाविणाऱ्या मल्लाची खरी ओळख यानिमित्ताने लोकांपर्यंत पोहोचणार आहे. याचाच मनस्वी अधिक आनंद मला होत आहे. दुर्लक्षित खाशाबा जाधव नावाच्या व्यक्तिमत्त्वाची जगाला खरी ओळख व्हावी यासाठीच माझा प्रामाणिक प्रयत्न असेल, अशी ग्वाहीदेखील नागराज मंजुळे यांनी दिली.

खाशाबा जाधव या मराठमोळय़ा कुस्तीपटूवर बायोपिक बनविण्याचं शिवधनुष्य मी आता उचललंय. या चित्रपटाचं ऑडिशन लवकरच सुरू होईल. या चित्रपटासाठी मला मातीतल्या मुलांची गरज आहे. आगामी वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकपर्यंत ‘खाशाबा’ चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केलं जाईल. ऑलिम्पिक स्पर्धा संपल्यानंतर क्रीडारसिकांमधील ऑलिम्पिकची झिंग उतरण्यापूर्वीच हा बहुचर्चित सिनेमा पडद्यावर झळकेल.’
– नागराज मंजुळे