
मुंबई, पुणे यासारख्या औद्योगिक शहरांमध्ये काम करणारे अनेक हात कोरोनामुळे पुन्हा एकदा शेतात नांगर हाकताना दिसू लागले आहेत. त्यामुळे गेली काही वर्षे संगणकांच्या की बोर्डवर सराईतपणे फिरणाऱ्या बोटांमध्ये आता नांगराला जुपलेल्या बैलाचा कासरा आला असल्याचे चित्र सध्या कोकणामध्ये पहावयास मिळत आहे.
मुंबई, पुणे या मोठ्या लोकवस्तीच्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर मुंबईतील चाकरमान्यांनी मुंबई सोडून गाव गाठण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला शहराबाहेर जाण्यास परवानगी नसल्याने गांव गाठण्याच्या प्रयत्नात असलेल्या चाकरमान्यांची गैरसोय मात्र पुढे शासनाकडून परवानगी मिळताच हजारोच्या संख्यने चाकरमानी आपापल्या गावी परतले. कोरोनामुळे गावी परतलेल्या बहुतांशी चाकरमान्यांनी परिस्थिती बदलली की पुन्हा नोकरीचे शहर गाठण्याचा विचार केला होता. मात्र आता मुंबई पुण्याकडची परिस्थिती बदलण्याची आशा मावळली असल्याने कोरोनामुळे गावात परतलेले चाकरमानी पुन्हा आपला पारंपारिक व्यवसाय असलेल्या शेतीकडे वळले आहेत.
कोकणात पावसाने आगमन झाल्यावर शेतीच्या कामाने वेग घेतला आहे. कोरोनाची दहशत असतानाही मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांनी पेरणी उरकली होती. पाऊस सुरु होताच शेतात वाफे तयार झाले असून आता कधीही लावणीला सुरवात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर लावणीपुर्व शेतीची मशागत म्हणजे शेतात नांगरटीला सुरवात झाली आहे. या वर्षी प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरात एक चाकरमानी आलेला असल्याने नांगर हाकण्याचे काम चाकरमानी करू लागले आहेत. त्यामुळे मुंबई पुणे येथील वातानुकूलित कार्यालयातील संगणकावर सफाईने चालणाऱ्या बोटांमध्ये आता बैलाचा कासारा आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.





























































