
लोटे औद्योगिक वसाहतीत उघडय़ावर रासायनिक सांडपाणी सोडून सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार कारखानदारांच्या अंगलट आला आहे. मुंबई येथून आलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱयांनी घातक रसायन फेकणाऱया योजना इंडस्ट्रीज आणि वनविड या दोन रासायनिक कारखान्यांनसह आणखी दोन रासायनिक कारखान्यांवर उत्पादन बंद करण्याची कारवाई केली आहे. तर एका कारखान्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
लोटे औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्याच्या प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. मासेमारी संपुष्टात आल्याने मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. वायू प्रदूषणामुळे आंबा, काजू यासारख्या नगदी पिकांची पुरती वाट लागली आहे. हे कमी की काय म्हणून काही कारखानदार घातक सांडपाणी रस्त्यालगतच्या नाल्यांमध्ये सोडून परिसरातील जनतेच्या जिवाशी खेळू लागले आहेत.
प्रदूषणाच्या प्रश्नावर स्थानिकांनी उग्र आंदोलनाचा पवित्रा घेताच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुंबई येथील दोन पथकांनी लोटे औद्योगिक वसाहतीतीला अचानक भेट देऊन येथील घरडा, एक्सल, पुष्कर यासारख्या काही मोठय़ा रासायनिक कारखान्यांच्या तपासणी सुरू केली. दोन दिवस कसून तपासणी झाल्यानंतर रस्त्यालगतच्या नाल्यात घातक रसायन फेकणाऱया योजना इंडस्ट्रीज, वनविड या दोन रासायनिक कारखान्यांसह सातत्याने प्रदूषण करणाऱया श्रेयस इंटरमिजियट आणि हरीश्री या दोन कारखान्यांनाही उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले. तर लासा सुपरजेनेरिक या रासायनिक कारखान्याला कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी चव्हाण यांनी दिली.
























































