खेड – 59 लाखांच्या दरोड्यातील मास्टरमाईडच्या मुसक्या आवळल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन किलो सोने स्वस्तात देण्याच्या आमिषाने तब्बल 59 लाख रुपयांच्या लूट प्रकरणातील मास्टरमाईंड किशोर पवार याच्या मुसक्या आवळण्यात रत्नागिरी गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. पवार आणि त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी मुंबई गोवा महामार्गावर चित्रपटात दाखवण्यात येतो तसा थरारक पाठलाग करत अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून 28 लाख 5 हजार 900 रुपयांची रोकड, कार आणि मोबाईल असा सुमारे 33 लाख 9 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

16 सप्टेंबर 2020 रोजी मुंबई गोवा महामार्गावरील उधळे गावच्या हद्दीतील जंगलांमध्ये 59 लाख रुपयांचा बदल्यात २ किलो सोन्याचा व्यवहार करण्यासाठी किशोर पवार यांने वेरळ वासेवाडी येथील अमर जड्याळ व अन्य तिघांना नेले होते. या ठिकाणी गेल्यावर घटनास्थळी अचानक आलेले किशोर पवार याचे साथीदार आणि किशोर पवार यांनी सोने खरेदी करण्यासाठी गेलेल्यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण केली आणि त्यांच्याकडे असलेली सगळी रोकड पळवून नेली होती. पोलिसांत याबाबतची तक्रार दाखल केल्यानंतर खेड पोलिसांनी दोन आरोपींना खेड येथून तर आणखी 6 जणांना रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथील जंगलातून पकडले होते. आणखी एका आरोपीला चार दिवसांपुर्वीच दापोली येथून अटक केली होती. मात्र या दरोडा प्रकरणातील मास्टरमाईंड किशोर पवार व त्याचे अन्य दोन साथीदार फरार होते.

रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक शिरिष ससाणे यांनी तपासाला गती दिली होती. किशोर पवार याच्या मागावर पोलिसांची पथके, सातारा, बेळगाव, पुणे, कोल्हापूर येथे रवाना करण्यात आली होती. पोलिसांना त्यांच्या खबऱ्यांकडून माहिती मिळाली की किशोर पवार व त्याचे दोन साथीदार कारने गोव्याला पळून जाणार आहेत. या माहितीनंतर पोलीस निरिक्षक ससाणे आणि त्यांच्या पथकाने मुंबई गोवा महामार्गावर सापळा रचला. महामार्गावर पोलीस गस्त घालत असतानाच त्यांना हवी असलेली कार नजरेस पडली.

पोलिसांनी कार थांबविण्याचा प्रयत्न केला,  मात्र कारचालकाने गाडी नं थांबवता सुसाट पळवली. पोलिसांनी या गाडीचा पाठलाग करायला सुरुवात केली आणि काही अंतरावर या गाडीला अडवण्यात त्यांना यश आले. पोलिसांनी या गाडीने जात असलेल्या किशोर पवार, सत्यवान साळुंखे आणि सचिन जाधव यांना अटक केली.  या आरोपींकडून पोलिसांनी चोरलेल्या 59 लाख रुपयांमधील 28 लाख रुपये रोकड, गाडी आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे.