
खेलो इंडिया बीच स्पर्धेतील पुरूषांच्या बीच सॉकरमध्ये अंदमान आणि निकोबारला हरवून महाराष्ट्राने उपांत्य फेरी धडक मारली आहे. पेंचक सिलटमधील रेगु प्रकारात महाराष्ट्राने २ रौप्य पदकाची कमाई करीत दिवस गाजविला.
दीवमधील घोघला समुद्र किनाऱ्यावर रंगलेल्या बीच सॉकर मैदानात महाराष्ट्राच्या मुलांनी सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. अंदमान आणि निकोबारवर संघावर १४-५ गोलने दणदणीत विजय संपादन पदकासह उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. कवीश दवणेसह सागर सिंगने तुफानी ३ गोल नोंदवून मैदान गाजवले. सिध्दार्थ कांबळे, साहिल डोंगरे, धवल तामोरे यांनी प्रत्येकी २ गोल तर मानस तामोरे, प्रतिक वापीलकर यांनी प्रत्येकी १ गोल करून महाराष्ट्राला दणदणीत विजय मिळवून दिला.
अंदमान आणि निकोबारवरविरूद्ध महाराष्ट्राने सुरूवातपासून आक्रमक खेळाचे प्रदर्शन घडवित ४-१ गोलने आघाडी घेतली होती. दुसऱ्या व तिसऱ्या टप्यातही अचूक पासिंग करीत ५-५ गोल नोंदवून स्पर्धेतील सलग दुसऱ्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सलामीच्या लढतीत महाराष्ट्राच्या पुरूष संघाने अरूणाचल प्रदेशचा ६-३ च्या फरकाने पराभव केला होता. तिसरा साखळी सामना गोवाविरूद्ध रंगणार आहे.
पेंचक सिलटमधील रेगु प्रकारात महाराष्ट्राच्या दोन्ही संघाने रूपेरी यश संपादन केले. महिलांच्या सांघिक प्रकारात ओरीसाकडून ५८०-५७६ गुणांनी पराभव स्वीकारावा लागला. महाराष्ट्राच्या जयश्री शेटे, क्रिनाशी येवले व अशिता यादवने रौप्य पदक मिळवले. पुरूषांच्या सांघिक प्रकारात तामिळनाडूने ६०६ गुण तर महाराष्ट्राने ५७५ गुण संपादून अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदके जिंकली. महाराष्ट्राकडून अंशुल कांबळे, अनुज सरनाईक व मुकेश चौधरीने रूपेरी यशावर नाव कोरले.
खेलो इंडियाच्या संयोजनात मराठी पाऊलखुणा
सलग दुसऱ्या वर्षी दीवमध्ये खेलो इंडिया बीच स्पर्धेच्या संयोजनात मराठी पाऊलखुणा उमटल्या आहेत. परभणी येथील अक्षय कोटलवार या दीव व दमण शासनामधील युवा क्रीडा अधिकाऱ्याने खेलो इंडिया बीच स्पर्धेची संकल्पना यशस्वी करून दाखवली आहे. कोटलवार हे राष्ट्रीय टेबलटेनिसचे खेळाडू असून दीव येथे आल्यानंतर त्यांनी बीच स्पर्धेसाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून साकर केली आहे. महाराष्ट्रसह संपूर्ण देशातून आलेल्या खेळाडूंना ते विशेष पाहुणचार देत असल्याने त्याचे कौतुक होत आहे. खेलो इंडिया बीच स्पर्धेनंतर आशियाई बीच स्पर्धा दीवमध्ये घेण्यासाठी कोटलवार यांचे ध्येय आहे.
































































