खो-खोत महाराष्ट्राची सातव्यांदा सत्ता; खेलो इंडिया युवा स्पर्धा,पदकाचा डबल धमाका, मुलांना सुवर्ण, मुलींना रौप्य

महाराष्ट्राने आपली हुपूमत गाजवित सातव्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत दोन्ही गटात सलग सातव्यांदा पदकाला गवसणी घातली. मुलांनी सुवर्ण, तर मुलींच्या संघाने रुपेरी यश संपादन केले. जलतरणात पदकाचा धडका कायम ठेवत रिलेमध्ये महाराष्ट्राने सुवर्णासह 1 रौप्य व 1 कांस्य पदकाची कमाई केली.

बिपार्ड मैदानावर संपलेल्या खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राचा जयजयकार दुमदुमला. मुलांच्या गटात महाराष्ट्राने ओडिशावर 34-25 गुणांनी मात करून सलग सातव्यांदा सुवर्ण पदक जिंकण्याचा पराक्रम केला. मुलींच्या गटात ओडिशाकडून महाराष्ट्र 31-34 गुणांनी पराभूत झाला, केवळ 3 गुणांनी महाराष्ट्राचे सुवर्ण पदक हुकले. या संघातील विश्वविजेत्या अश्विनी शिंदे हिने सलग चौथ्यांदा पदक जिंकण्याचा विक्रमही नोदंविला.

मुलांच्या गटात सुरुवातीपासून ओडिशा विरुद्ध महाराष्ट्राने आक्रमक खेळ केला. अचूक गडी टिपून संरक्षणातही महाराष्ट्र आघाडीवर राहिला. जितेंद्र वासवे याने तब्बल 2 मिनिटाची ड्रीम रन करीत ओडिशाला झुंजवले. पूर्वार्धात 16-10 गुणांनी आघाडी घेतल्यानंतर आशीष गौतम, राज जाधव व शरद घाडगे यांनी अष्टपैलू खेळ करीत पहिल्याच फेरीपासून विजयी वाटचाल सुरू केली होती. 9 गुणांनी विजय संपादून महाराष्ट्राने खेलो इंडियातील आपली सुवर्ण परंपरा कायम राखली. पदक वितरण समारंभानंतर ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘जय भवानी-जय शिवाजी’चा जयघोष करण्यात आला.

मुलींच्या गटात महाराष्ट्राची आक्रमणात पिछेहाट झाल्याने ओडिशाने बाजी मारली. अटीतटीच्या लढतीत पहिल्या मिनिटापासून महाराष्ट्राने चपळता दर्शवली. अमृता पाटील, सुहानी धोत्रे व प्रतीक्षा बिराजदार यांचा अष्टपैलू खेळ सामना जिंकण्यासाठी अपुरा ठरला. गडी बाद करण्यात अपयश आल्याने ओडिशाने 3 गुणांनी विजेतेपद पटकावले. खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींचे हे सातवे पदक आहे. गत तामीळनाडू स्पर्धेत महाराष्ट्र चॅम्पियन ठरला होता.