बालसाहित्य परिषदेची स्थापना गरजेची : राजीव तांबे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

आताच्या पिढीतील मुलांसाठी दर्जेदार साहित्य निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी मराठी साहित्य परिषदेच्या धरतीवर बाल साहित्य परिषद निर्माण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध बालसाहित्यिक व बाल साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक राजीव तांबे, मुंबई यांनी बुलढाणा येथे केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ नागपूर, विदर्भ साहित्य संघ यांच्या पुढाकाराने बुलढाणा येथे आयोजित राज्यस्तरीय बाल साहित्य लेखक मेळाव्याचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ नागपूरचे अध्यक्ष डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ नागपूरचे कोषाध्यक्ष डॉ. विलास देशपांडे, सुप्रसिद्ध बालकवी उत्तम कोळगावकर, सुप्रसिद्ध समीक्षक विद्या सुर्वे -बोरसे यांचेसह विदर्भ साहित्य संघाच्या बुलढाणा शाखेचे अध्यक्ष डॉ. अनंत शिरसाट, मेळाव्याचे संयोजक नरेंद्र लांजेवार, बालसाहित्यिक प्रशांत गौतम यांची उपस्थिती होती.

पुढे राजीव तांबे म्हणाले की, साहित्यक्षेत्रात प्रौढ साहित्याला मिळणारे महत्त्व म्हणजे म्हणजे पिकांची कापणी आहे. पण बाल साहित्य म्हणजे साहित्य क्षेत्रातील पेरणी असून या पेरणीची योग्य काळजी घेतली तर साहित्यक्षेत्र समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी सांगितले की, भाषा, साहित्य संस्कृती, अभिरुची, कला, अभिव्यक्ती या सर्व बाबी विवेकी, सहिष्णू आणि संवेदनशील समाज निर्मितीसाठी अतिशय आवश्यक असणारे घटक आहेत. अशा प्रकारचे लहान -लहान मेळावे मोठ- मोठ्या संमेलनांपेक्षा खूप मोठा विचार आणि उर्जा देऊ शकतात. त्यासाठी राज्यशासनाने अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे. अलीकडच्या काळामध्ये निर्माण झालेली अभिरुची ही बाजाराच्या गरजा पुरवणारी आहे. ती दीर्घकाळ टिकणारी नसून जीवनाचा गरजा पुरवणारी अभिरुची ही भाषा आणि साहित्यातून निर्माण होऊ शकते असे सांगितले. भाषा संवर्धनावर सध्या खर्च केला जाणारा निधी हा अतिशय तोकडा असून त्यामध्ये वाढ होण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.

यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष डॉ. विलास देशपांडे यांनी महामंडळाची भूमिका मांडली तर मेळाव्याचे संयोजक नरेंद्र लांजेवार यांनी बालसाहित्य लेखक मेळाव्याच्या आयोजनाबाबत आपली भूमिका प्रास्ताविकातून विषद केली. यावेळी प्रसिद्ध बालसाहित्यिक फारुख काजी यांच्या ‘प्रिय अब्बू’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाला प्रस्तावना देणारी मैत्री लांजेवार हिने आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद शिंगाडे यांनी केले तर आभार डॉ. अनंत शिरसाट यांनी मानले.