Jaipur kidnap case मध्ये ट्विस्ट; अपहरणकर्ताच निघाला मुलाचा बाप, प्रेमात भिकारी बनला होता पोलीस

जयपूरमध्ये एका 11 महिन्यांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. तब्बल 14 महिन्यांनंतर त्या मुलाचा शोध लागला. पोलिसांनी अपहरणकर्त्याला बेड्या ठोकून मुलाला त्याचा आईकडे सोपविले. मात्र दीड वर्षाच्या काळात लहान मुलाला अपहरणकर्त्याचा इतका लळा लागला की तो त्याच्या आईजवळ जाण्यास तयार नव्हता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता या घटनेची नव्याने माहिती समोर आली असून अपहरकर्ताच मुलाचे वडील असल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरणकर्त्याचे नाव तनुज चाहर असे असून त्याने आपणच मुलाचा बाप असल्याचा दावा केला आहे. तसेच आरोपीला त्याचा मुलगा परत हवा असून मुलाची आणि त्याची DNA टेस्ट करण्याची मागणी त्याने केली आहे. त्यामुळे पोलिस आणि नातेवाईक सगळेच संभ्रमात पडले आहेत.

हे सगळे प्रेमप्रकरण असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. आरोपी चाहर उत्तर प्रदेशातील निलंबित हेड कॉन्स्टेबल असल्याचे समजते. मुलाची आई ही आरोपीच्या आत्याची मुलगी आहे. त्याचे तिच्यावर अनेक वर्षांपासून प्रेम होते. याबद्दल तिच्या घरच्यांना समजताच त्यांनी तिचे लग्न जयपूरच्या एका मुलाशी लावून दिले. आरोपी तनुजचे लग्न आधीच झाले होते. त्याला 21 वर्षांचा मुलगा देखील आहे. मात्र प्रेयसीच्या प्रेमात वेडा झालेल्या तनुजने बायको आणि मुलाला देखील सोडून दिले.

आरोपी तनुज चाहरचा प्रेमभंग झाल्यानंतर त्याने प्रेयसीला शोधण्यासाठी पोलिसातल्या नोकरीला देखील लाथ मारली आणि भिकाऱ्यासारखं आयुष्य जगू लागला. प्रेयसीला शोधण्यासाठी तो वर्षभर जयपूरमधील रस्त्यांवर राहिला. प्रेयसीचा पत्ता लागताच त्याने तिच्या नवऱ्यासोबत संपर्क साधण्यास सुरूवात केली व तो तिच्या घरी ये-जा करू लागला. त्याचे घरी येणे वाढल्यामुळे प्रेयसीने त्यांच्या प्रेमाबद्दल तिच्या नवऱ्याला सांगितले. त्यानंतर काही महिन्यांनी ती गरोदर राहिली आणि तिने पृथ्वी नावाच्या मुलाला जन्म दिला. त्यानंतर तिने अचानक आरोपी तनुज सोबतचा संपर्क तोडला.

प्रेयसीने पुन्हा संपर्क तोडल्याने दोघांमध्ये वाद सुरू झाला. तनुज बाळाला घेऊन प्रेयसीला त्याच्याजवळ येण्याकरीता जबरदस्ती करू लागला. परंतू तिने त्याचे न ऐकल्यामुळे तनुजने 14 जून 2023 प्रेयसीच्या घरी जाऊन 11 महिन्यांच्या पृथ्वीचे अपहरण केले आणि फरार झाला. पकडला जाऊ नये म्हणून बाळाला घेऊन तो अनेक राज्ये फिरला, मात्र बाळाला काही दुखापत नाही होऊ दिली. 14 महिन्यानंतर त्याचा शोध लागला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

सोशल मीडियावर व्हायरल होत असणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसणारा लहान मुलगा अपहरणकर्ता तनुज चाहरपासून लांब जाण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. पोलिसांनी त्याला तनुज चाहरपासून वेगळे करताच मुलगा धाय मोकलून रडू लागला. त्याला रडताना बघून तनुज चाहरचे देखील डोळे पाणावले होते. हे पाहून तिथे उपस्थित असलेले सगळेच आश्चर्यचकित झाले होते. त्यानंतर त्याला त्याच्या आईजवळ सोपवण्यात आले.